आकोटमधील पालकांना न्याय मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:02 IST2016-08-18T02:02:16+5:302016-08-18T02:02:16+5:30

शोषखड्डय़ात बालकांचा बुडून मृत्यू प्रकरण : अकोल्याचा न्याय आकोटला नाही !

When will parents get justice for parents in the mound? | आकोटमधील पालकांना न्याय मिळणार कधी?

आकोटमधील पालकांना न्याय मिळणार कधी?

विजय शिंदे
आकोट, दि १७: आकोट रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पाण्याच्या शोषखड्डय़ात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आकोट रेल्वे स्टेशनचे प्रबंधक व इतर जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध आकोट शहर पोलिसात २१ जुलै रोजी पालकांनी तक्रार दाखल केली आहे; परंतु याप्रकरणी महिना झाला, अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर दुसरीकडे आकोला येथे शोषखड्डय़ात दोन बालकांचा बुडून झालेल्या मृत्युप्रकरणी पालिका आयुक्तासह दोषीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकाच जिल्ह्यातील दोन वेगवेगळय़ा पोलीस स्टेशनमध्ये एकाच प्रकारचे साम्य असलेल्या घटनांवरून पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केल्या जात आहे. रेल्वे स्टेशनच्या वसाहतीजवळ असलेल्या पाण्याच्या शोषखड्ड्यात १९ जुलै रोजी विराज संजय देशमुख व हितेश सुनील जेस्वाणी या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये पालक सुनील कन्हैयालाल जेस्वाणी व संजय पंजाबराव देशमुख यांनी तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार मुलांच्या मृत्यूस जबाबदार असलेले स्टेशन प्रबंधक आकोट रेल्वे स्टेशन, कंत्राटदार व अन्य संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. आकोट शहर पोलिसांनी सदर तक्रार स्वीकृत केली; परंतु अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही, तर अकोला येथील महापालिकेच्या शाळा मैदानावर खोदण्यात आलेल्या शोषखड्डय़ात सिद्धार्थ धनगावकर व कृष्णा बहेल या दोन बालकांचा १४ ऑगस्ट रोजी बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची पालकाने तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी करून खदान पोलीस स्टेशनला मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्था, अभियंता व कंत्राटदार यांच्याविरुद्ध भादंवि ३0४ अ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकोट व अकोला या दोन्ही ठिकाणी शोषखड्डय़ात बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सारखीच आहे. दोन्ही ठिकाणी दुर्लक्ष केल्याने संबंधित बालकांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले आहेत; मात्र आकोट पोलिसांनी सदर बालकांच्या मृत्युची तक्रार गंभीरतेने घेतली नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागातील दोन पोलीस स्टेशनमधील या कारवाईवरून सर्वसामान्य नागरिकांत मात्र कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यामुळे आकोट येथील बालकांच्या मृत्यूप्रकरणी पालक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: When will parents get justice for parents in the mound?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.