कापसाला अग्रीम बोनस केव्हा मिळणार?
By Admin | Updated: November 29, 2014 21:56 IST2014-11-29T21:56:04+5:302014-11-29T21:56:04+5:30
विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी प्रतीक्षेत.
_ns.jpg)
कापसाला अग्रीम बोनस केव्हा मिळणार?
अकोला: यावर्षी कापूस उत्पादनात प्रंचड घट झाली असून, त्यातच भावही पडल्याने, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याच्या पृष्ठभूमीवर, राज्य शासनाकडून अग्रीम बोनस केव्हा जाहीर केला जातो, याकडे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे महसूल, तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादक शेतकर्यांना अग्रीम बोनस देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे जाहीर केल्याने, राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आतापर्यंत शेतकर्यांनी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ आणि व्यापार्यांना कापूस विकला आहे; पण अग्रीम बोनसच्या घोषणेनंतर कापूस विकावा कुणाला, अशा संभ्रमात शेतकरी सापडला आहे. सध्या गरजेपोटी हजारो शेतकरी या तिन्ही कापूस खरेदीदारांना कापूस विकत आहेत; पण अग्रीम बोनसच्या घोषणेमुळे कापूस विकण्यासाठी शेतकर्यांचा कल कापूस उत्पादक पणन महासंघाकडे वाढत आहे.
कापूस एकाधिकार योजना जोरात सुरू असताना, शेतकर्यांना पणन महासंघामार्फत अग्रीम बोनस देण्यात येत होता; परंतु ती योजना गुंडाळल्यानंतर, अग्रीम बोनसही बंद झाला. आता राज्यातील दुष्काळी स्थिती बघता, अग्रीम बोनस देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे संचालक शिरीष धोत्रे यांनी राज्य शासनाने, आर्थिक संकट सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकर्यांना अग्रीम बोनस तातडीने जाहीर करण्याची अथवा प्रति क्विंटल हमी दर वाढवून देण्याची मागणी केली आहे.
- एक ते दोन हजार अग्रीम बोनस ?
कापसाला यावर्षी ४,0५0 रू पये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात प्रतवारीनुसार शेतकर्यांना ३,९00 रू पये प्रति क्विंटल भाव मिळत आहे; परंतु अग्रीम बोनस जाहीर झाल्यास शेतकर्यांना कापसाच्या प्रतवारीनुसार प्रति क्विंटल ५,८00 ते ५,९00 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे.