महायुती फुटल्याने रिपाइं सापडली पेचात

By Admin | Updated: September 28, 2014 00:57 IST2014-09-28T00:57:06+5:302014-09-28T00:57:06+5:30

रिपाइं (आठवले) चे विदर्भात सात उमेदवार!

When the Mahayuti was broken, the rifle was found | महायुती फुटल्याने रिपाइं सापडली पेचात

महायुती फुटल्याने रिपाइं सापडली पेचात

राजरत्न सिरसाट/ अकोला
राज्यसभेच्या एका खासदारकीच्या मोबदल्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीसोबत एकदिलाने लढलेल्या रिपाइं (आठवले)ची, महायुती संपुष्टात आल्यांनतर मात्र चांगलीच गोची झाली आहे. भाजपने या पक्षासाठी आठ जागा सोडल्या असल्या तरी, केवळ विदर्भात सात विधानसभा मतदारसंघांमध्ये रिपाइंने उमेदवार उभे केले आहेत.
राज्यात भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र यावी, हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांची स्वप्नं साकारण्यासाठी रिपाइं (आठवले) आणि शिवसेना एकत्र आले आणि राज्यात एका नवीन राजकीय समीकरणाला सुरुवात झाली. या दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्य़ा असल्या तरी राज्याच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे रिपाइं नेते रामदास आठवले यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. या मोबदल्यात आठवले यांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली. आठवले यांना राज्यसभेवर पाठवण्यामागे भाजपची दुरदृष्टी असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वतरुळात रंगली होती.
चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले; पण राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अभेद्य महायुती जागा वाटपाच्या मुद्यावरू न पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी विचारधारेला तिलाजंली देत जागांच्या मुद्यावर प्रतिष्ठा पणाला लावल्याने या युतीच्या रौप्यमहोत्सवी वर्षांंचा शेवट वियोगाने झाला. महायुती कायम राहावी, याकरिता आठवले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण या दोन्ही पक्षांना एकत्र ठेवण्यात त्यांनाही यश आले नाही.
महायुती संपुष्टात आल्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देत शिवसेनेसोबत आलेल्या रिपाइंची, आता मात्र चांगलीच गोची झाली आहे. महायुतीतील भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊन अगोदरच भावनिक साद घातली आहे. पण शिवसेनेसोबत असल्यामुळेच त्यांना खासदारकी मिळाली, हे वास्तव आहे. त्यामुळे आठवले पेचात सापडले आहेत; परंतु केंद्र शासनात मंत्रिपद मिळावे, ही त्यांची अनेक वर्षांपासूनची आकांक्षा आहे. केंद्रात भाजपची स्वबळावर सत्ता असल्याने त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षाही वाटत आहे. भाजपाने याबाबतचे त्यांना आश्‍वासन दिले असल्याची कुजबूज राजकीय वतरुळात सुरू आहे. त्यामुळेच रिपाइंने भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या पक्षासाठी राज्यातील आठ जागा सोडण्यात आल्या. या आठ जागांमध्ये विदर्भातील केवळ दोन जागांचा समावेश असला तरी, प्रत्यक्षात रिपाइंने विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत.
राजकीय अस्तित्वावरून पक्षाचे वजन ठरत असल्याने रिपाइंने राज्यात काही अन्य मतदारसंघांमध्येही उमेदवार उभे केले असून, त्यात विदर्भातील सात उमेदवारांचा समावेश आहे. यात अकोला जिल्हय़ातील अकोला पूर्व मतदारसंघ, वाशिम जिल्ह्यातील वाशिम विधानसभा मतदारसंघ, बुलडाणा जिल्हय़ातील मेहकर, अमरावती जिल्हय़ातील तिवसा, यवतमाळ जिल्हय़ातील उमरखेड, वर्धा जिल्हय़ातील वर्धा, तसेच उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातही पक्षाने उमेदवार उभे केले आहेत.

Web Title: When the Mahayuti was broken, the rifle was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.