When is 'CHB' professors will get Honorarium | ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधन केव्हा?
‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधन केव्हा?


अकोला : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना गतवर्षीचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे या शिक्षकांची दिवाळी अंधारातच गेली. सहा कोटींचे अनुदान मानधनासाठी आले असताना येथील उच्च व शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ‘सीएचबी’ प्राध्यापक मानधनापासून वंचित आहेत.
उच्च शिक्षण घेऊनही शिक्षकांची नोकरी नाही. तासिका तत्त्वावर मिळणाऱ्या मानधनातून सीएचबी शिक्षक कसेबसे उदरनिर्वाह करीत आहेत. राज्य शासनाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी आदेशानुसार, सीएचबी प्राध्यापकांना महिन्याकाठी १५ हजार रुपये मानधनाचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आक्षेप सीएचबी प्राध्यापकांनी नोंदविला आहे. विभागातील १५२ महाविद्यालयांत सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. २०१८-१९ मधील सीएचबी प्राध्यापकांच्या थकीत मानधनासाठी सहा कोटी रुपये शासनाने पाठविले; परंतु नियोजनाअभावी ही रक्कम दिवाळीत मिळाली नाही. तत्कालीन सहसंचालक संजय जगताप यांनी आॅगस्टपूर्वी मानधन दिले जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु मध्यंतरी जगताप यांची बदली झाली आणि मानधनाचा विषय रखडला. अद्यापही ६८ महाविद्यालयांच्या सीएचबी प्राध्यापकांचे मानधन प्रलंबित आहे.

या कादगपत्रांची होईल तपासणी!
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ६८ महाविद्यालयांमध्ये कार्यरत सीएचबी प्राध्यापकांचे मानधन अद्यापही देण्यात आले नाही. तांत्रिक त्रुटींमुळे संबंधित प्राध्यापकांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी होणार आहे. उच्च व शिक्षण सहसंचालक कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सीएचबी प्राध्यापकांचे प्रलंबित मानधन दिले जाणार असल्याची माहिती आहे.

चालू शैक्षणिक वर्षातील सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनाचे प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत; मात्र गतवर्षीचे ८२ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांचे मानधन प्राचार्यांच्या खात्यात जमा झाले आहे. ६८ महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे मानधन तांत्रिक कारणांनी रोखले आहेत. ते लवकरच अदा करण्यात येईल.
- केशव तुपे, प्रभारी सहसंचालक, उच्च व शिक्षण विभाग, अमरावती.

 

Web Title: When is 'CHB' professors will get Honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.