रेल्वे अर्थसंकल्पात पश्‍चिम विदर्भाची निराशाच

By Admin | Updated: February 27, 2015 00:34 IST2015-02-27T00:34:03+5:302015-02-27T00:34:03+5:30

अकोला-महू मार्ग वगळता ठोस निर्णय नाही

Western Vidarbha disappointment in Railway budget | रेल्वे अर्थसंकल्पात पश्‍चिम विदर्भाची निराशाच

रेल्वे अर्थसंकल्पात पश्‍चिम विदर्भाची निराशाच

अकोला- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना अकोला, बुलडाणा, वाशिम या तीन जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून पश्‍चिम विदर्भाची घोर निराशा केली आहे. गेज परिवर्तनासाठी अकोला-महू रेल्वे मार्गाकरिता जाहीर केलेला २00 कोटी रुपयांचा निधी वगळला, तर या परिसरासाठी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मध्य रेल्वे आणि दक्षिण-मध्य रेल्वे या दोन मोठय़ा रेल्वे विभागाचे ठिकाण असलेल्या अकोला येथून महूपर्यंतच्या मार्गाच्या गेज परिवर्तनाचा प्रस्ताव आहे. गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्पात गेज परिवर्तनाच्या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने २00 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे गेज परिवर्तनाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्‍चिम विदर्भातील हा एकमेव निर्णय वगळता, रेल्वे मंत्रालयाने या भागातील कोणत्याही प्रस्तावाचा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. बडनेरा-वाशिम आणि वाशिम-माहूर-आदिलाबाद या दोन नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. खामगाव-जालना, मलकापूर-चिखली या मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत रेल्वे अर्थसंकल्पात विचारच करण्यात आला नाही. भुसावळ-बडनेरा-वर्धा या मार्गावर तिसरी लाइन टाकण्याच्या कामासाठी सर्वेक्षणाकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती-चांदूरबाजार-बैतूल या ७१ किलोमीटरच्या मार्गाचेही सर्वेक्षण होणार आहे. शकुंतला रेल्वे मार्गाबाबत मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पश्‍चिम विदर्भाला निराश केले.

Web Title: Western Vidarbha disappointment in Railway budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.