पश्चिम वर्हाडात अघोषित नोटाबंदी; एटीएममध्ये ठणठणाट!
By Admin | Updated: May 9, 2017 19:50 IST2017-05-09T19:50:21+5:302017-05-09T19:50:21+5:30
अकोला, बुलडाणा व वाशिम या पश्चिम वर्हाडाच्या पट्टय़ातील एटीएममध्ये ठणठणाट आहे.

पश्चिम वर्हाडात अघोषित नोटाबंदी; एटीएममध्ये ठणठणाट!
अकोला : अकोला, बुलडाणा व वाशिम या पश्चिम वर्हाडाच्या पट्टय़ातील एटीएममध्ये ठणठणाट आहे. गेल्या महिनाभरापासून एटीएममध्ये रक्कमच नसल्याने ग्राहकांची प्रचंड ससेहोलपट होत आहे, तर दुसरीकडे बँकाही केवळ दोन ते पाच हजारापर्यंतच विड्रॉल देत असल्याने ग्राहकांच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे.
तीनही जिल्हय़ात विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची जवळपास १५00 च्यावर एटीएम आहेत. नोव्हेंबर महिन्यात केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच एटीएम बंद पडले होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊन सर्वच एटीएम सुरू होऊन पैशांची चणचणही राहिली नाही; परंतु गेल्या महिनाभरापासून शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी एटीएममध्ये पैशांची प्रचंड चणचण आहे. रिझर्व्ह बँकेकडून मागणीनुसार पुरेशा प्रमाणात रोकड मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बँकांच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. केवळ बोटावर मोजणारे एटीएम सुरू असतात; मात्र त्यामध्ये रक्कम टाकताक्षणीच अवघ्या तासाभरात संपून जात आहे. या प्रकारामुळे दैनंदिन व्यवहार करण्यासाठी लागणारी रोकड ग्राहकांना उपलब्ध होत नाही.
कॅशलेस सुविधाच नाही
मे महिन्यामध्ये अनेक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र लग्नाची धूम आहे; मात्र एटीएममध्ये ठणठणाट आहे, तर बँकाही आवश्यक तेवढे पैसे देत नाही. दुसरीकडे किराणा व कापडाच्या दुकानातही स्वाइप मशीन न लागल्यामुळे कॅशलेस व्यवहार करणे ग्रामीण भागातील नागरिकांना शक्य होत नाही. परिणामी, बहुतांश व्यवहार ठप्प पडले आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयापासून रिझर्व्ह बँकेने पूर्वीप्रमाणे मुबलक कॅश देणे बंद केले आहे. जास्तीत जास्त ऑनलाइन व कॅशलेस व्यवहार व्हावेत, हा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे बँकांकडे पैसेच येत नाहीत. त्यामुळेच एटीएममध्येही पैसे नाहीत, अशी माहिती लिड बँकांच्या अधिकार्यांनी दिली.