‘जलमुक्त होळी’साठी आम्ही बांधील!
By Admin | Updated: March 24, 2016 02:09 IST2016-03-24T02:09:38+5:302016-03-24T02:09:38+5:30
वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिकासह महावितरण व बँक कर्मचा-यांनी घेतली शपथ.

‘जलमुक्त होळी’साठी आम्ही बांधील!
अकोला: जलमुक्त होळी साजरी करून पाण्याची नासाडी थांबवावी, असे लोकमतने केलेल्या आवाहनाला शहरातून सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका, परिचारिकांनी जलमुक्त होळी साजरी करून कोरडी होळी खेळण्याची शपथ घेतली.
लोकमतच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी बुधवारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, अधिपरिचारिका, महाविद्यालयातील विभागप्रमुखांची बैठक बोलावून त्यांना जलमुक्त होळी खेळण्याचे आवाहन केले आणि सध्या मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे दुष्काळाच्या झळांसोबतच पाणीटंचाईची भीषणता अनुभवत आहे. त्यामुळे यंदाची होळी पाण्याविना साजरी करून आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन डॉ. कार्यकर्ते यांनी केले. यावेळी डॉ. कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत डवंगे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, अधिपरिचारिका ग्रेसी मरियम, महेश महाकालीवार, डॉ. प्रमोद ठाकरे, डॉ. कल्पना काळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, विभाग प्रमुख आणि सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका, परिचारक, सफाई कामगारांना जलमुक्त होळी साजरी करण्याची शपथ दिली.
महावितरणच्या अधिकारी, कर्मचा-यांनीही घेतली शपथ
महावितरण कंपनीमधील कार्यकारी अभियंता किशोर मेश्राम, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) महेश दुशेलवार, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, गुरमितसिंह गोसल, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड यांच्यासह महावितरण कंपनीमधील अधिकारी, कर्मचार्यांनी पाण्याची नासाडी न करता कोरडी होळी साजरी करण्याची शपथ घेतली.