दुबार पेरणी उलटण्याच्या वाटेवर
By Admin | Updated: August 2, 2014 23:35 IST2014-08-02T23:35:19+5:302014-08-02T23:35:19+5:30
शेतकर्यांना पावसाची प्रतिक्षा

दुबार पेरणी उलटण्याच्या वाटेवर
सिंदखेडराजा : जून, जुलै संपुन ऑगस्टही उजाडला तरीसुद्धा पावसाची हुलकावणीच असल्यामुळे शेतकर्यांनी केलेली दुबार पेरणीही आता उलटण्याच्या वाटेवर आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, तालुक्यातील शेतकर्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांच्या अशा पल्लवीत झाल्या. तालुक्यात फेब्रुवारी मार्च मध्ये झालेल्या गारपिटीने रब्बीचा हंगाम हातचा निघुन गेला. ज्यांनी खरिपाची पेरणी मृग नक्षत्रात एका पावसावर केली, ती पेरणी पावसाच्या दडीमुळे पुर्णत: उलटली. कपाशी तर वखरून टाकण्यात आली. कपाशी लागवडीचा मोसम निघून गेला. त्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला. नुकतेच सोयाबीनचे पीक जमिनीतुन वर आले आहे. परंतू पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे सोयाबीन पिकही सुकू लागले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. त्यातही अनियमित विद्युत पुरवठा असल्याने चार तासही पिकाला पाणी मिळत नाही. निसर्ग तर कोपलाच परंतू, वीज वितरणही शेतकर्यांशी खेळत आहे. तालुक्यात सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद, ज्वारी या खरीप पिकाच्या ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येणार्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या उलटल्याशिवाय राहणार नाही.
** १५ हजार शेतकर्यांनी काढला पीक विमा दुष्काळाच्या छटा उमटत असल्याने तालुक्यातील १५ हजार शेतकर्यांनी ३१ जुलै पर्यंत पीक विमा उतरविला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची मुदत वाढल्याने पुन्हा त्यात भर पडणार आहे. पीक विम्याचे संरक्षण हा एकमेव आधार शेतकर्यांना तारणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.