दुष्काळी भागातील पाणीपट्टी माफ करावी!
By Admin | Updated: January 11, 2015 01:11 IST2015-01-11T01:11:51+5:302015-01-11T01:11:51+5:30
काटेपूर्णा प्रकल्पस्तरीय पाणीवाटप समितीच्या बैठकीत मागणी.

दुष्काळी भागातील पाणीपट्टी माफ करावी!
अकोला- जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर नापिकी झाली. या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतील भागात पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी काटेपूर्णा प्रकल्पस्तरीय पाणीवाटप समितीच्या बैठकीत पदाधिकार्यांनी केली.
काटेपूर्णा प्रकल्पस्तरीय पाणीवाटप समितीची बैठक बोरगाव मंजू येथे पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व पाणीवाटप समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी आरक्षण करताना पाणीवाटप समितीच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेण्यात यावे. पाणीवाटप करताना विश्वासात घेतले नाही, तर उद्योजकांकडूनच पाणीपट्टी वसूल करावी, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली.
पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचनाची गरज आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय सर्व पाणीवाटप संस्थांना कार्यालय व साहित्य आणि एका कर्मचार्याचे किमान मानधन देण्यात यावे. प्रकल्पांच्या समादेशक्षेत्रात नवीन प्रकल्प घेण्यात येऊ नये. पाणीवाटप संस्थांचे ऑडिट शासनामार्फत करण्यात यावे. शासनातर्फे वीज परवाना देण्यात यावा, मुख्य कालव्यापासून लघू कालव्यापर्यंंत उपसा सिंचनाकरिता वीज जोडणी देण्यात यावी, आदी मागण्याही या बैठकीत करण्यात आल्यात.