जंगलातील पाणवठे कोरडेठण्ण

By Admin | Updated: May 11, 2014 22:55 IST2014-05-11T21:55:36+5:302014-05-11T22:55:01+5:30

वन्य प्राण्याची पाण्यासाठी भटकंती; शिकारीत वाढ

Waterfalls in the jungle | जंगलातील पाणवठे कोरडेठण्ण

जंगलातील पाणवठे कोरडेठण्ण

उंबर्डा बाजार : सोहळ अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या उंबर्डाबाजार सोमठाणा मार्गावरील जंगलातील पाणवठे तीव्र उन्हामुळे कोरडे पडले असून जंगलातील प्राणी तहानेने व्याकुळ होवून वणवण भटकत बागापूर पाझर तलावावर येत आहेत. मात्र काही शिकारी आपला डाव साधून त्यांची शिकार करीत आहेत. मात्र वनविभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस मोर, हरीण, काळविटांसह अन्य प्राण्यांची संख्या घटत चालली आहे. सोहळ अभयारण्यातील सोमठाणा मार्गावरील जंगलात पावसाळय़ाच्या दिवसात मुबलक पाणीसाठा व निसर्ग संपदेसह घनदाट जंगल असल्याने या परिसरात मोर, लांडोर, ससे, हरीण, काळवीट, रोहीसह अन्य प्राण्यांचा मोठय़ा प्रमाणात संचार दिसून येतो. सध्याचे उन्हाळय़ाचे दिवस लक्षात घेता वनविभागाने वन्य प्राण्याकरीता पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध केली नाही. फक्त फेफरी परिसरात एक हातपंप काही वर्षापासून बसविण्यात आला असून त्या ठिकाणी प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाळे बनविण्यात आले आहे. परंतु ते पाणी उपलब्ध करुन देण्याकडे सुद्धा वनविभागाचे दुर्लक्ष असल्याने पाण्याचे टाके नेहमीच कोरडे दिसून येते.संपूर्ण परिसरात बागापूर पाझर तलावच एकमेव वन्य प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवित असताना पर जिल्हय़ातील काही शिकारी या पाझर तलावाच्या काठावर सापळे रचून मोर, लांडोर, ससे, हरीण आदी प्राण्यांची शिकार करीत आहेत. मात्र वनविभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.  

Web Title: Waterfalls in the jungle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.