हिवाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची स्थिती
By Admin | Updated: November 12, 2014 00:05 IST2014-11-12T00:05:34+5:302014-11-12T00:05:34+5:30
राज्यातील दीडशे गावांना टँकरने पाणीपुरवठा.

हिवाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची स्थिती
बुलडाणा: राज्यात यावर्षी झालेल्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर, हिवाळा प्रारंभ होतानाच, राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा अद्याप लांब असताना राज्यात तब्बल १७७ गावे-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पाणी पुरवठा विभाग आणि जलसंधारणाच्या डझनावरी योजनांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही, राज्यातील काही भागांमध्ये पिण्याचे पाणी पोहचवण्याची कायमस्वरूपी व्यवस्था अजूनही निर्माण होऊ शकलेली नाही. राज्यातील एकूण ३८ गावे आणि १३९ वाड्यांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासाठी एकूण ६७ टँकर कामाला लावण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ९४, सोलापूर जिल्ह्यात २६, जालना जिल्ह्यात १८, अहमदनगर जिल्ह्यात १६, बुलढाणा जिल्ह्यात चार, तर लातूर जिल्ह्यातील एका गावाचा टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये समावेश असल्याची माहिती, पाणी पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे. यापैकी बहुतांश गावांना कायमस्वरूपी टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. गतवर्षी याच कालावधीत २२ गावे आणि १४३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची पाळी आली होती.