ऐन दिवाळीत होणार पाणीपुरवठा ठप्प

By Admin | Updated: October 17, 2014 01:22 IST2014-10-17T01:22:50+5:302014-10-17T01:22:50+5:30

पम्पिंग मशीन दुरुस्त करण्यास कंत्राटदाराचा नकार.

Water supply will be canceled in Diwali | ऐन दिवाळीत होणार पाणीपुरवठा ठप्प

ऐन दिवाळीत होणार पाणीपुरवठा ठप्प

अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाचपैकी दोन पम्पिंग मशीन दुरुस्त केल्यानंतर अत्यावश्यक असणारी तिसरी मशीन दुरुस्त करण्यास संबंधित कंत्राटदाराने स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. थकीत देयकामुळे कंत्राटदाराने हा निर्णय घेतल्याने जलप्रदाय विभागाची कोंडी झाली असून, शहराचा पाणीपुरवठा कधीही ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.
महान येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीनमध्ये ५ ऑक्टोबर रोजी तांत्रिक बिघाड झाला. पाण्याचा उपसा करण्यासाठी किमान दोन मशीन सलग सुरू ठेवणे व एक मशीन तयार (स्टॅन्डबाय) असणे अपेक्षित आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येतो. ६५ एमएलडी प्लांटवरील पाचपैकी अवघ्या दोन पम्पिंग मशीन सुरू आहेत.
यामधील एक मशीन अचानक नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तर २५ एमएलडी प्लांटवरील ३ पैकी दोन पम्पिंग मशीन बंद राहत असल्याची स्थिती आहे. ६५ एमएलडी प्लांटवर पाचपैकी तीन मशीन सतत सुरू राहिल्यास व उर्वरित दोन कायमस्वरूपी दुरुस्त ठेवल्यास अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा करणे शक्य आहे.
यादरम्यान, पम्पिंग मशीनच्या दुरुस्तीचा कंत्राट माउली नामक संस्थेला देण्यात आला असून, संबंधित कंत्राटदाराचे सुमारे २५ लाखांचे देयक थकीत आहे. देयक अदा करण्यासाठी मन पाकडून कोरडी आश्‍वासने दिली जात असल्यामुळे कंत्राटदाराने तिसरा पम्प दुरुस्त करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
अर्थातच, दोन पम्पिंग मशीनद्वारे सतत पाण्याचा उपसा करणे शक्य नसून, त्यावर दाब आल्यास कोणत्याही क्षणी मशीन जळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ऐन सणासुदीच्या दिवसात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास नागरिकांची दिवाळी पाण्याविना होईल.

Web Title: Water supply will be canceled in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.