पाणीटंचाई वाढली; पिकावर परिणाम!
By Admin | Updated: March 28, 2016 01:22 IST2016-03-28T01:22:00+5:302016-03-28T01:22:00+5:30
उन्हाळी पिके जगवण्यासाठी अतिदुर्गम भागात व्यवस्थापनावर भर.

पाणीटंचाई वाढली; पिकावर परिणाम!
अकोला: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर विदर्भातील उन्हाळी पिकांचे व्यवस्थापन व काळजी घेण्यात येत असून, शेतकर्यांना यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यावर्षी विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये उन्हाळी भुईमूग पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणार्या या प्रकल्पांतर्गत विविध पिकांच्या उत्पादनवाढीवर भर देण्यात येत आहे. दुर्गम भागातील शेतकर्यांना शेतावर पीक प्रात्यक्षिक व व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २0१५-१६ या वर्षी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतीपुढील आव्हाने बघता, शेतकर्यांसाठीच्या योजनांवर अधिक भर देण्यात आला असून, कृषी विद्यापीठामार्फत भुईमूग पिकाच्या अद्ययावत लागवड तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने पातूर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी भागातील सावरगाव, वसाली व पांगरताटी येथील लाभार्थींच्या शेतावर अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांना देण्यात आली. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकर्यांना उन्हाळी भुईमूग पिकाचे अद्ययावत लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन होण्याच्या दृष्टीने बुधवारी सावरगाव येथे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार हा दुर्गम डोंगरी भागातील सर्व शेतकर्यांपर्यंत होईल तसेच परिसरातील उन्हाळी भुईमूग घेणार्या शेतकर्यांनी विद्यापीठाने दिलेल्या पीक प्रात्यक्षिकास भेट देऊन उन्हाळी भुईमूग लागवडीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घेऊन या पिकाच्या उत्पादनवाढीचे सुधारित तंत्रज्ञान अवगत करावे, हा उद्देश आहे. विदर्भातील शेतकर्यांनी तंतोतंत शेती करू न पिकांच्या उत्पादनात वाढ करावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला आहे. या अंतर्गत कार्यक्रम दुर्गम भागात राबविण्यात येत आहे.