पश्चिम विदर्भातील फळबागांवर पाणीटंचाईचे संकट!
By Admin | Updated: May 5, 2015 00:05 IST2015-05-05T00:05:39+5:302015-05-05T00:05:39+5:30
धरणं, भूगर्भपातळीत घट ; संत्रा, लिंबू, भाजीपाला पिके धोक्यात.

पश्चिम विदर्भातील फळबागांवर पाणीटंचाईचे संकट!
अकोला: पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांची जलपातळी खालावली असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळीही घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जवळपास एक लाख हेक्टरवरील फळ पिके धोक्यात आली आहेत.
मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे, जलसाठे ओव्हरफ्लो झाली होती. यामुळे यावर्षी शेतकरी निश्चिंत होता; परंतु जमिनीतील पाण्याची हवी तेवढी सरासरी वाढली नव्हती, परिणामी विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. पडलेला पाऊस वेगाने वाहून गेल्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नाही. या सर्व परिस्थितीची झळ भाजीपाला व फळ बागायतदार शेतकर्यांना सोसावी लागत आहे.
अकोला जिल्हय़ात सर्वाधिक ३,१५0 हेक्टरवर संत्रा आहे. दुसर्या क्रमांकावर २३00 हेक्टर लिंबू असून, केळी २२५0 हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५0, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९0 तर आंबा ६२५ हेक्टर आहे. गेल्या दोन वर्षात शेतकर्यांनी फळ पिकांचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणार्या पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्हय़ातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारे येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. आताच पाण्याची पातळी घसरली आहे. येणार्या पावसाळ्य़ात पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे फळे उत्पादक शेतकरी आतापासूनच चिंतेत आहे.