अकोला जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट
By Admin | Updated: November 12, 2014 01:09 IST2014-11-12T01:09:16+5:302014-11-12T01:09:16+5:30
टंचाई निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट
अकोला : यावर्षी अल्प पावसाळा झाल्यामुळे हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट असून, आगामी काळात पाण्याची भीषण समस्या भासणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून १६ नोव्हेंबरपूर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही सभागृहात २0१४-१५ करिता आरक्षित करावयाच्या पाणीसाठा व जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना यासंबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील काही भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी आतापासूनच ३0 जूनअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी अरुण शिंदे यांनी दिले.
जिल्ह्यातील १0९ गावांमधून अकोला तालुक्यातील चार गावे, पातूर तालुक्यातील १३, मूर्तिजापूर तालुक्यात नऊ गावे, आकोटमधील १७, बाळापूर तालुक्यातील चार, तेल्हारा तालुक्यातील सहा गावे, तर बार्शिटाकळी तालुक्यातील ४६ गावांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत मूर्तिजापूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, हिंगणा हेडवर्क्स येथे नोव्हेंबरअखेरीस पाणीपुरवठा होऊ शकतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था उमा धरणावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ५७ खेडी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणातील पाणी मूर्तिजापूरला वापर करण्याबाबतचे निर्देशही यावेळी देण्यात आले.