मूर्तिजापूरसाठी महान धरणातून सोडले पाणी
By Admin | Updated: July 10, 2014 01:28 IST2014-07-10T01:21:41+5:302014-07-10T01:28:14+5:30
मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी काटेपूर्णा धरणातून २५0 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग.

मूर्तिजापूरसाठी महान धरणातून सोडले पाणी
अकोला: मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून बुधवारी २५0 दशलक्ष घनमीटर पाणी काटेपूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले. या जलसाठय़ातून मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा होणार असल्याने, जलसंकटाची परिस्थिती टळली आहे.
मूर्तिजापूर शहराला महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी काटेपूर्णा नदीपात्रातून मूर्तिजापूरजवळील हिंगणा-खडका येथील पाण्याची उचल केली जाते.
पावसाळा सुरू होऊन, महिना उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याची स्थिती आहे. काटेपूर्णा नदीपात्रात पाणी उपलब्ध नसल्याच्या स्थितीत मूर्तिजापूर शहरात जलसंकटाची स् िथती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी होती. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार, पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी महान येथील काटेपूर्णा धरणातून २५0 दशलक्ष घनमीटर पाणी काटेपूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले. काटेपूर्णा नदीत सोडण्यात आलेल्या या पाण्यातून मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे मूर्तिजापूर शहरात निर्माण होणार्या तीव्र पाणीटंचाईचे संकट तूर्तास टळले आहे.