महिन्यातून फक्त एक दिवस मिळते पाणी

By Admin | Updated: May 25, 2017 01:14 IST2017-05-25T01:14:32+5:302017-05-25T01:14:32+5:30

धामणा, नैराट, वैराट, राजापूर गावांत भीषण पाणीटंचाई : निवेदन देऊनही टँकर सुरू करण्याकडे दुर्लक्ष

Water only gets one month in a month | महिन्यातून फक्त एक दिवस मिळते पाणी

महिन्यातून फक्त एक दिवस मिळते पाणी

राजेश्वर वैराळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव वैराळे : अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नैराट, वैराट, राजापूर व धामणा गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी खांबोरा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा होत असला, तरी महिना-महिना पिण्याचे पाणीच गावात पोहोचत नसल्यामुळे चारही गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
ज्यांना पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडते, असे लोक १०० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, असे लोक पूर्णा नदीच्या पात्रात झिरे करून पिण्यासाठी पाणी आणतात. पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अकोला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला असला, तरी अद्यापही या चारही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडून सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत.
अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नैराट, वैराट, राजापूर व धामणा गावांत दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत असते. मागील वर्षी या चारही गावांत पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता; मात्र पाण्यासाठी ग्रामस्थांनी भांडणे केल्याने त्यावेळी स्थानिक ग्रामपंचायतने आठ दिवसांतच टँकर बंद करण्याबाबतचा ठराव अकोला पंचायत समितीकडे रीतसर पाठविला होता.
यावर्षी गावात जाणवत असलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे गावकरी अक्षरश: वैतागले आहेत. चारही गावांतील ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायतला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत रीतसर निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांनी केलेल्या टँकरच्या मागणीबाबत नैराट, वैराट, राजापूर व धामणा येथील ग्रामपंचायतने ठराव घेऊन स्थानिक अकोला पंचायत समितीकडे पाठविले आहेत.
या ठरावाद्वारे पाणीटंचाईच्या काळात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे; धामणा, नैराट, वैराट, राजापूर या चारही गावांत बारमाही पाणीटंचाईचे सावट गेल्या कित्येक वर्षांपासून असले, तरी या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थ घेतात १०० रुपये ड्रमने पाणी
या चारही गावांत पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची आहे; परंतु या चारही गावांत अगदी अमावस्या पौर्णिमेसारखे महिन्यातून एखाद्या दिवशी, तेही तास-दोन तास पाणी येते.यामुळे पाणीटंचाईच्या काळात जे ग्रामस्थ पिण्यासाठी पाणी विकत घेऊ शकतात, ते ग्रामस्थ टँकरद्वारे पाणी आणतात. ज्यांना पाणी विकत घेणे शक्य नाही, असे गोरगरीब लोक पूर्णा नदीच्या पात्रात झिरे करून पिण्यासाठी पाणी आणताना दिसतात. ज्यांना पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडते, असे लोक १०० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेत आहेत.

नैराट, वैराट, राजापूर गावांत महिना महिनाभर पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केल्या आहेत; मात्र तक्रारीची दखल घेऊन गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत नसल्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे.
- सुनील परनाटे, सरपंच, नैराट.

धामणा गावात दोन महिन्यांपासून नळ योजनेच्या पाण्याचा थेंबही पोहोचला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असला, तरी वरिष्ठांकडून त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जात नाही.
- अनिल भांबेरे, उपसरपंच, धामणा.

नैराट, वैराट, राजापूर या गावांत नेहमीच पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे टँकरद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासोबत गावातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- राजेश गरकल, ग्रामसेवक, नैराट.

धामणा गावातील पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे आठ दिवसांपूर्वी प्रस्ताव सादर केलेला आहे.
- दीपाली भोंबळे, ग्रामसेवक, धामणा.

Web Title: Water only gets one month in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.