संगणकीय स्वाक्षरीच्या दाखल्यांमध्ये वाशिम तालुका राज्यात अव्वल
By Admin | Updated: September 12, 2014 23:17 IST2014-09-12T01:58:26+5:302014-09-12T23:17:56+5:30
इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट : १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण

संगणकीय स्वाक्षरीच्या दाखल्यांमध्ये वाशिम तालुका राज्यात अव्वल
वाशिम : इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्टअंतर्गत संगणकीय स्वाक्षरीद्वारे १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण करून, वाशिम तहसील कार्यालय राज्यात संगणकीय कामकाजात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. १0 सप्टेंबर रोजी हा बहुमान वाशिम तालुक्यास घोषित करण्यात आला आहे.
संगणकीय प्रणालीचा वापर करून कामकाज ह्यहायटेकह्ण करण्यासाठी राज्यभर इ-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट १ जानेवारी २0१४ पासून राबविण्यात येत आहे. संगणकीय स्वाक्षरीद्वारे विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र वितरित करण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकाची पारितोषिक योजनाही सुरू करण्यात आली आहे. त्या योजने अंतर्गत वाशिम तहसील कार्यालय अव्वल ठरले आहे तर धुळे तहसील कार्यालय द्वितीय तर कोल्हापूर तहसील तृतिय क्रमांकावर आहे.
वाशिम तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या मार्गदर्शनात १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २0१४ या कालावधीत जवळपास १0 हजार ८४0 दाखल्यांचे वितरण केले. यामध्ये इ-महासेवा केंद्र व सेतुमार्फत आलेले नऊ हजार ३0४ उत्पन्नाचे दाखले, एक हजार ४२९ अधिवास प्रमाणपत्र, ११ ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र, १0 जन्म नोंदी आदेश, १0 मृत्यू नोंदी आदेश व ७६ इतर प्रमाणपत्र अशा एकूण १0 हजार ८४0 प्रमाणपत्रांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस राज्यस्तरावर संगणकीय कामकाजाचे मूल्यमापन केले असता, यात वाशिम तहसील कार्यालय अव्वल ठरले.