वारी येथील डोहामध्ये गेले आतापर्यंत १६८ बळी !
By Admin | Updated: August 17, 2016 02:22 IST2016-08-17T02:22:29+5:302016-08-17T02:22:29+5:30
१९९२ पासून ते आत्तापर्यंत १६८ जणांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू; शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त.

वारी येथील डोहामध्ये गेले आतापर्यंत १६८ बळी !
गोवर्धन गावंडे
हिवरखेड(जि. अकोला), दि. १६: अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी येथील डोहामध्ये १९९२ पासून १६८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
वारी येथील नदीच्या पात्रामध्ये हनुमान मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या मामाभाच्याचा डोह, दत्त मंदिराजवळ व जामुठी डोहामध्ये अनेकांचे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. वारी येथील प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिरामध्ये २६ जानेवारी व १५ ऑगस्ट तसेच सुट्यांमध्ये या ठिकाणी बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यातील पर्यटक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतात. या ठिकाणी असलेल्या या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. डोहामध्ये बुडणार्यांमध्ये शालेय विद्यार्थी व युवकांचे प्रमाण जास्त असल्याने पोलीस स्टेशनच्या नोंदीवरून समजते. वारी हे गाव १९९0 ते ९२ च्या दरम्यान वसल्यानंतर वारी येथे मंदिरासह वान धरण पाहण्यासाठी शालेय सहली येतात. १९९२ पासून ते आत्तापर्यंत १६८ जणांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला असून यामध्ये शालेय विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात बुडाले आहेत. मागील २ वर्षामध्ये शेगाव, जळगाव या ठिकाणाहुन आलेल्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. १८ ते २५ पर्यंत वयोगटातील युवक या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंत कळत नसल्याने बुडतात. या ठिकाणी सामाजिक संस्था, पोलीस विभाग, महसूल विभाग यांनी जर येणार्या नागरिकांना डोहाच्या बाजुला सावधानतेचा इशारा देणारा फलक किंवा डोहाच्या आजुबाजूला तार कंपाउंड केले तर अनेकांचे जीव वाचू शकतील. पोलीस पाटील कासोटे यांनी सांगितले की, १९९२ पासून या वान नदीच्या डोहामध्ये आत्तापर्यंत १६८ लोकांना जलसमाधी मिळाली आहे.