कॅनॉलची जागा पाहिजे,मोबदला द्या!
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:00+5:302016-06-07T07:42:00+5:30
पाटबंधारे विभागाचे मनपाला पत्र.

कॅनॉलची जागा पाहिजे,मोबदला द्या!
अकोला: जुने शहराच्या विकासाला चालना देणार्या कॅनॉल रस्त्याचे काम प्रशासनाच्या लालफितशाहीत अडकण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.रस्त्यासाठी कॅनॉलची जमिन हवी असल्यास महापालिकेने सरकारी दरानुसार पैसे जमा करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाने मनपाला पाठवले आहे. या पत्रावर मनपा काय निर्णय घेते,याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.
जुने शहरातील डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते नवीन किराणा मार्केटपर्यंंतच्या कॅनॉल रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांंपासून रखडले आहे. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली कॅनॉलची जागा ताब्यात घेऊन मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंंत डांबरी रस्त्याचे निर्माण केले होते. त्यानंतर मात्र रस्ता रुंदीकरणाला घरघर लागली. सुमारे १२0 फूट रुंद असलेल्या कॅनॉलच्या जागेवर स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रमाणात अतिक्रमण करून पक्की घरे उभारली आहेत. दरम्यान, मनपाने २0१४ मध्ये कॅनॉल रस्त्याची निविदा मंजूर केली; मात्र काम सुरू होऊ शकले नाही. किमान ३५ ते ४0 फूट रुंदीचा रस्ता झाल्यास जुने शहरातील सर्व वाहतूक शहराबाहेरून निघण्यास मदत होईल. यामुळे डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, भीमनगर चौक, काळा मारुती रोड, जय हिंद चौक आदी भागांतील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. कॅनॉल रस्त्यामुळे जुने शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रशासनाला पुरेपूर जाणीव आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मध्यतरी पहिल्यांदाच संयुक्तरित्या डाबकी रोडपासून ते जुना बाळापूर रोडपर्यंंत कॅनॉल रस्त्याची पाहणी केली होती.
डाबकी रोड ते संत गोरोबा मंदिरपर्यंंत रस्ता कसा?
डाबकी रोड पासून ते कॅनॉल लगतच्या संत गोरोबा मंदिरपर्यंंत यापूर्वीच डांबरी रस्ता तयार आहे. ही जमिन सुध्दा पाटबंधारे विभागाची आहे. असे असताना नव्या प्रस्तावित रस्त्याला पाटबंधारे विभागाकडून निकष लावल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.