पावसाची प्रतीक्षा, शेतकरी चिंताग्रस्त
By Admin | Updated: June 27, 2014 00:39 IST2014-06-26T20:22:15+5:302014-06-27T00:39:50+5:30
तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांची स्थिती बिकट.

पावसाची प्रतीक्षा, शेतकरी चिंताग्रस्त
पाथर्डी : तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मृग नक्षत्राचा कालावधी कोरडा गेला. अजूनही पाऊस येण्याची चिन्हे दिसून येत नसल्यामुळे शेतकरी यावर्षीसुद्धा आर्थिक संकटात येण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
पेरणीपूर्व मशागत करून आपल्या काळ्या मातीत बी-बियाणे टाकण्याच्या तयारीत असलेल्या शेतकर्याचा या पावसामुळे भ्रमनिरास झाला. शेतमजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले. तसेच शेतकर्यांना आता पेरणी इतकेच आपल्या गुराढोरांच्या चार्याचा प्रश्न भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडील चारा हाताशी आलेल्या अनेक शेतकर्यांनी आपली गुरेढोरे मिळेल त्या भावाने विक्रीस काढली आहेत. त्यामुळे ऐनवेळी शेतीकामाच्या दिवसात आपल्याकडील गुरेढोरे विक्री करण्याच्या प्रसंग आपल्यावर आल्यामुळे शेतकरी बेचैन दिसून येत आहे. शेतकरी बेचैन दिसून येत आहे. मागीलवर्षी अवकाळी पाऊस व गारपीट संकटातून कसाबसा वाचलेला शेतकरी सद्यस्थितीत कोरड्या दुष्काळात सापडलेला आहे.