शिक्षण संचालकांच्या परवानगीची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 00:42 IST2017-05-27T00:42:46+5:302017-05-27T00:42:46+5:30
शिक्षण विभागाची तयारी: अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मात्र खडतर

शिक्षण संचालकांच्या परवानगीची प्रतीक्षा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इयत्ता अकरावीची यंदा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली असून, त्यासाठी पुणे येथील शिक्षण संचालक जरग यांना परवानगी मागितली आहे; परंतु शिक्षण संचालकांनी अद्यापपर्यंत अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग खडतर असल्याची चिन्हे दिसत आहेत.
अमरावती शहराप्रमाणेच अकोला शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग सकारात्मक आहे. अभाविप, एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांनीसुद्धा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याची मागणी केली होती. कनिष्ठ महाविद्यालयांकडून होणारी विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक या प्रवेश पद्धतीने थांबविण्यासाठी शिक्षण विभागानेसुद्धा यासाठी पुढाकार घेतला. शिक्षण उपसंचालकांनी अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने घेण्यासंदर्भात परवानगी दिल्यानंतर शिक्षण विभागाने शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा प्रथमच केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नियोजन सुरू केले. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठकसुद्धा शिक्षण विभागाने घेतली. त्यानंतर शिक्षण संचालक जरग यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.
आता शिक्षण संचालकांच्या परवानगीची शिक्षण विभागाला प्रतीक्षा लागून आहे; परंतु शिक्षण संचालक जरग यांनी परवानगी दिली नाही, तर यंदाची केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश रखडू शकतात, अशी चिन्हे दिसत आहेत.
विद्यार्थी संघटना, पालकांनी पुढाकार घ्यावा
४यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरातील महाविद्यालयांमध्ये राबविण्याची शक्यता धूसर आहे. कनिष्ठ महाविद्यालये व शिकवणी वर्गांच्या खाबूगिरीला आवर घालण्यासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने झालीच पाहिजे. यासाठी विद्यार्थी संघटनांसोबतच पालकांनी पुढाकार घ्यावा आणि शिक्षण संचालकांना परवानगी देण्यासाठी बाध्य करावे, अन्यथा अकोल्यातील विद्यार्थी केंद्रीय पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतील.
केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात प्रस्ताव आलेला नाही. दहावीचे निकाल काही दिवसांमध्ये जाहीर होतील, त्यामुळे यंदा परवानगी देणे अशक्य आहे; परंतु शिक्षण उपसंचालकांकडून हा विषय आपल्याकडे आल्यास आणि गरज असल्यास आपण परवानगीसाठी विचार करू.
- नामदेव जरग, शिक्षण संचालक.
केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आलेला आहे. शुक्रवारी शिक्षण संचालक अमरावतीत येत आहेत. येथे शिक्षण उपसंचालकांच्या मार्गदर्शनात त्यांच्यासोबत अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा करून त्यांच्याकडे अकोल्यात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी विनंती करू.
- प्रकाश मुकुंद