प्रतीक्षा निवडणुकीच्या तारखांची
By Admin | Updated: September 1, 2014 22:50 IST2014-09-01T22:50:00+5:302014-09-01T22:50:00+5:30
नियोजन थांबले: जागा वाटपही लांबले, कार्यकर्त्यांना संभ्रमाने पछाडले

प्रतीक्षा निवडणुकीच्या तारखांची
बुलडाणा: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा लांबल्याने राजकीय पक्ष आणि प्रशासनाचाही खेळखंडोबा सुरू झाला आहे. एकदा का निवडणुकीची घोषणा झाली की, पुढील प्रक्रियेला गती येत असल्याने सर्वांचेच लक्ष निवडणुकीच्या तारखांकडे लागले आहे.
विद्यमान विधानसभेचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा ९ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २0१४ असा आहे. त्यामुळे नोव्हेंबर पूर्वी विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या दोनच महिने शिल्लक आहेत. सुरुवातीला १५ ऑगस्टनंतर निवडणुकांची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. राजकीय जाणकारांनीही असेच आडाखे बांधले होते. ही तारीख डोळ्यापुढे ठेवूनच राजकीय पक्ष, उमेदवारीचे बाशिंग बांधून बसलेले इच्छुक व प्रशासनाने तयारी चालविली होती. इच्छुकांडून अर्ज मागवून घेणे, त्यांच्या मुलाखती घेणे, निरीक्षकांकडून आढावा घेणे आदी बाबी पक्षश्रेष्ठींनी धुमधडाक्यात सुरू केल्या होत्या. महायुतीने तर १५ ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू, अशीही घोषणा केली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसनेही जागा वाटपाच्या चर्चेंची गती वाढविली होती. दोन्ही काँग्रेसचे विभागीय मेळावेही पार पडले होते. नव्हे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा न् जिल्हा पिंजून वातावरण निर्मिती केली होती. विद्यमान आमदारांनी आपली उमेदवारी पक्की असल्याचे मानून मतदारसंघातील दौरे वाढविले होते. भूमिपूजन व लोकार्पणाचाही धडाका सुरू झाला होता. तर संभाव्य उमेदवार उमेदवारी मिळविण्यासह मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यावरही भर देण्यात गुंग झाले होते. अशीच काहीशी तयारी प्रशासनानेही चालविली होती. आचारसंहितेपूर्वी आमदार निधीतून प्रस्तावित झालेल्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरात देण्याची लगबग सुरू झाली होती. ज्या अधिकार्यांनी एकाच जिल्ह्यात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला अशा अथवा जे अधिकारी गृह जिल्ह्यात कार्यरत आहेत अशा अधिकार्यांच्या बदल्यांची प्रक्रियाही आटोपण्यात आली होती.
मतदार यादी अद्ययावत करणे, ईव्हीएमची व्यवस्था करणे, आदी प्रक्रियेलाही गती देण्यात आली होती. एकूणच राजकीय व प्रशासकीय पातळीवर विधानसभा निवडणुकांच्या कामांना गती देण्यात आली होती; मात्र ऑगस्ट महिना संपला तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली नाही. परिणामी, राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणेतही संथपणा आला आहे. राजकीय पातळीवरील घडामोडींचा वेग मंदावला आहे. महायुती व आघाडी यांच्यातील जागा वाटपाचे गुर्हाळ कायम आहे. तर तिसर्या आघाडीच्या रूपात नवा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार्या छोट्या-छोट्या पक्षांमधील उत्साहही कमी झाला आहे. आता गणेशोत्सव सुरू झाला. त्यामुळे संभव्य अचारसंहितेची तारीख पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. प्रशासनावर आधीच ताण वाढला आहे.
महायुती अथवा आघाडी दोन्हींचे उमेदवार निश्चित होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी वाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांनी आपल्याच पारड्यात वजन टाकावे यासाठी काही इच्छुक गत काही महिन्यांपासून कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांचे लाड पुरवित आहेत. त्यासाठी त्यांना आर्थिक झळही सोसावी लागत आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंंत हा प्रकार सुरूच ठेवावा लागणार आहे. आता तर निवडणुका लांबल्यामुळे इच्छुकांचे बजेट वाढले असून, कार्यकर्त्यांची चंगळ सुरू झाली आहे.