खेड्यांतील रस्त्यांची लागली वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:39+5:302021-08-25T04:24:39+5:30
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाट लागली असून, उखडलेले आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न बिकट ...

खेड्यांतील रस्त्यांची लागली वाट !
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाट लागली असून, उखडलेले आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न बिकट झाल्याने, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खेड्यातील रस्ते खड्ड्यात गेल्याचा प्रत्यय येत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य यंत्रणांतर्गत विविध गावांना जोडणाऱ्या इतर जिल्हा मार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यातही रस्ते, पूल व रपट्यांचे नुकसान झाले. उखडलेले रस्ते आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचा शोध घेऊनच वाहनधारकांना चालावे लागत असून, अनेकदा अपघाताचे प्रसंग घडत आहेत. काही गावांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, रस्त्याच्या समस्येने ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. परंतु या गंभीर समस्येकडे मात्र संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खड्ड्यात हरवला हिंगणा वाडेगाव मार्ग !
अकोला तालुक्यातील हिंगणा ते वाडेगाव हा २६ किलोमीटरचा मार्ग खड्ड्यात हरवला आहे. या मार्गावर हिंगणा, कळंबेश्वर, गोरेगाव, माझोड, भरतपूर, नकाशी व वाडेगाव इत्यादी गावे आहेत. संबंधित गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. वर्षभरापूर्वी या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते ; मात्र मध्येच ते थांबविण्यात आले. पाऊस आणि पुराच्या तडाख्यात रस्त्याची आणखीच वाट लागली. खड्डेमय रस्ता आणि लहान पुलांची कामे रखडल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी बससह चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाल्यागत असून, दुचाकी वाहनांची वाहतूक सुरु असली तरी, खड्डे पाहूनच वाहनधारकांना चालावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या मार्गाचे काम सुरु करण्यात आले असले तरी, मार्गाची दुरवस्था आणि रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने या मार्गाऐवजी कापशी मार्गे फेऱ्याने ग्रामस्थांना प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे.
मांडोली लोहारा रस्त्याची चाळण!
जिल्ह्यातील पारस भागातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ पासून मांडोली ते लोहारा या रस्त्यांची चाळण झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या या २२ किलोमीटर लांबीच्या इतर जिल्हा मार्गावर मांडोली, कोळासा, कसूरा, सोनगिरी, कळंबी, कळंबी महागाव, कळंबी खुर्द, डोंगरगाव व लोहारा इत्यादी गावे आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात रस्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना परिसरातील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात हरवलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत असताना, रस्ता दुरुस्तीकडे मात्र संबंधित यंत्रणेकडून कानाडोळा करण्यात येत आहे.