प्रतीक्षा संपली, अकोला जिल्ह्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण

By atul.jaiswal | Published: January 13, 2021 11:16 AM2021-01-13T11:16:26+5:302021-01-13T11:25:04+5:30

Corona Vaccine News : जिल्ह्यात शनिवारपासून ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच केंद्रांवर लस दिली जाणार आहे

The wait is over, with corona vaccinations starting Saturday in the Akola district | प्रतीक्षा संपली, अकोला जिल्ह्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण

प्रतीक्षा संपली, अकोला जिल्ह्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण

Next
ठळक मुद्दे८,८७८ आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाइन यादी तयार.लसीकरणारसाठी जिल्ह्यात पाच केंद्रांची निवड करण्यात आली.पहिल्या दिवशी ५०० कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाविरुद्ध लस निर्मिती झाल्यानंतर, १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणास प्रारंभ होणार आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने तयारी केली असून, जिल्ह्यात शनिवारपासून ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास भारत सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर, लसीकरणाची रंगीत तालीम म्हणून देशभरात ड्राय रन घेण्यात आला. अकोला जिल्ह्यातही आरोग्य विभागाने आठ जानेवारी रोजी लसीकरणाची रंगीत तालीम घेतली. जिल्ह्यात तब्बल ८,८७८ आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाइन यादी तयार करण्यात आली असून, या सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी कोविन ॲपमध्ये करण्यात आली आहे. लसीकरणारसाठी जिल्ह्यात पाच केंद्रांची निवड करण्यात आली असून, त्या दृष्टीने या केंद्रांवर व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड ही लस देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाला अद्याप लसीचे डोस प्राप्त झाले नसले, तरी येत्या एक ते दोन दिवसांत लस मिळण्याची शक्यता असून, शनिवारपासून लसीकरणास प्रारंभ होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

 

या केंद्रांवर दिली जाणार लस

लसीकरणास प्रारंभ करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने जिल्ह्यात पाच केंद्रांची निवड केली आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय, कोविड आयसीयू, ऑर्बीट हॉस्पीटल, मुर्तीजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व बार्शीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. या पाच केंद्रांवर प्रत्येकी १०० अशा ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना १६ जानेवारी रोजी लस दिली जाणार आहे.

कशी दिली जाईल लस?

लसीकरणासाठी जिल्ह्यातील ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी कोविन ॲपमध्ये करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या एक दिवस आधी एसएमस पाठविले जाणार आहेत. केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी व्यवस्था असेल. पहिल्या दिवशी ५०० कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर, लसीच्या उपलब्धतेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

 

सामान्य नागरिकांना मार्चपर्यंत प्रतीक्षा

पहिल्या टप्प्यात केवळ ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. सामान्य नागरिकांना मात्र लसीकरणासाठी मार्च महिना किंवा त्यापेक्षाही अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

लसीकरणाच्या दृष्टीने आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केली आहे. लसीचे डोस अद्याप प्राप्त झाले नसले, तरी लवकरच ते प्राप्त होऊन १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ केला जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी तयार राहावे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: The wait is over, with corona vaccinations starting Saturday in the Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.