मतदान करा, औषधींवर सूट मिळवा!
By Admin | Updated: October 15, 2014 01:34 IST2014-10-15T01:34:59+5:302014-10-15T01:34:59+5:30
टक्केवारी वाढविण्यासाठी केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा निर्णय.

मतदान करा, औषधींवर सूट मिळवा!
सचिन राऊत /अकोला
मतदानाची टक्केवारी मोठय़ा प्रमाणात वाढावी व लोकशाहीच्या या मतदान यज्ञामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्हय़ातील प्रत्येक औषध दुकानावर औषधांवर घसघशीत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान करून शाईचे बोट दाखविल्यास १५ ते २0 ऑक्टोबर या कालावधीत अकोला जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्व औषधी दुकानांवरून औषध घेणार्यांना १५ ते २0 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मतदानाची टक्केवारी वाढल्यास योग्य उमेदवार विधानसभेत जाण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे मतदारसंघाचा विकास, त्या भागातील प्रलंबित प्रश्न, समस्या मार्गी लावण्याचा ध्यास असलेल्या आणि जनसामान्यांसाठी काहीतरी करणार्या उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी मतदान महायज्ञामध्ये सर्वांना सहभागी करण्यासाठी अकोला जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. राज्याच्या विधानसभेसाठी बुधवारी मतदान होणार आहे. त्यामुळे केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सोमवारी सायंकाळी तातडीची बैठक घेऊन जिल्हय़ातील सर्व औषधी दुकानावरून औषध घेणार्यांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान करून शाईचे बोट दाखविणार्यांना जिल्हय़ातील कुठल्याही औषधी दुकानावर १५ ते २0 ऑक्टोबर या कालावधीत १५ ते २0 टक्के सूट देण्यात येणार आहे. यासाठी एक कार्ड तयार करण्यात आले असून, हे कार्ड दवा बाजारातील केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यालयामधून घेतल्यानंतर रुग्णांना औषधी दुकानांवरून १५ ते २0 टक्के सूट देण्यात येणार आहे. जिल्हय़ातील ७00 औषधी दुकानांवरून ही सूट देण्यात येणार असून, यामध्ये केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्वच औषधी दुकानांवरून ही सूट देण्यात येणार आहे.