तेल्हारा तालुक्यातील हिरव्या पिकांवर ‘वाणीं’चा हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:43+5:302021-07-17T04:15:43+5:30

प्रशांत विखे तेल्हारा : गत तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी आदी ...

'Voices' attack on green crops in Telhara taluka! | तेल्हारा तालुक्यातील हिरव्या पिकांवर ‘वाणीं’चा हल्ला!

तेल्हारा तालुक्यातील हिरव्या पिकांवर ‘वाणीं’चा हल्ला!

प्रशांत विखे

तेल्हारा : गत तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी आदी पिके अंकुरलेली आहेत. सद्य:स्थितीत शेत हिरवेगार झाले आहे; मात्र या हिरव्या पिकांवर ‘वाणीं’नी हल्ला चढविल्याने शेतकरी चिंतित आहेत. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार, शेतकऱ्यांनी फवारणीसुद्धा केली; मात्र तरीही वाणींचा प्रकोप सुरूच असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली असून, पिके अंकुरली आहेत. पेरणीसाठी बियाणांचा तुडवडा असताना अनेक शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक बियाणे मिळवले. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने मृग नक्षत्रात पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने दडी दिल्याने पिके संकटात सापडली होती. शेतकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास सिंचन करून पिके जगविली. सद्य:स्थितीत शेतात पिके बहरलेली असताना वाणी अळ्यांनी पिकांवर हल्ला चढविला असून, पीक फस्त करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत, यावर उपाय म्हणून माहिती घेतली व त्यानुसार पिकांवर फवारणी केली. मात्र तरीही वाणींचा बंदोबस्त झाला नाही.

--------------------------

आता दुबार पेरणीचे संकट!

वाणींचा प्रकोप सुरूच असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. दुबार पेरणी करायची म्हटली, तर बियाणे उपलब्ध नसल्याने कसे उपलब्ध करायचे, खर्च कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. तेल्हारा खुर्दमधील प्रमोद गावंडे यांच्या शेतातील २० एकर सोयाबीन, तळेगाव डवला येथील विलास ताथोड व पुरुषोत्तम ताथोड यांच्या शेतातील मूग, उडीद व कपाशीवर हल्ला चढवून ‘वाणीं’नी पीक फस्त केले आहे.

Web Title: 'Voices' attack on green crops in Telhara taluka!