खेड्यांची वाट बिकट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:41+5:302021-08-25T04:24:41+5:30
हिंगणा ते वाडेगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसची ...

खेड्यांची वाट बिकट...!
हिंगणा ते वाडेगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली असून, इतर चारचाकी वाहनांची वाहतूकदेखील बंद आहे. केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू असली तरी, खड्डे पाहूनच वाहनधारकांना चालावे लागते. रस्त्याच्या बिकट समस्येने या मार्गावरील ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत.
सुरज अशोक कदम
युवा शेतकरी, कळंबेश्वर
.............फोटो......................
गेल्या अडीच वर्षांपासून हिंगणा ते वाडेगाव या पालखी मार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते; मात्र लगेच ते बंद करण्यात आले. अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्याची आणखीच चाळण झाली असून, या रस्त्यावरून वाहनधारकांना चालणे कठीण झाले आहे. दोन महिन्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल होत आहे. त्यामुळे या मार्गावरील चारचाकी, तीनचाकी वाहनांची वाहतूक बंद असून, ९ किलोमीटर फेऱ्याने कापशी मार्गे वाहतूक सुरू आहे.
पंकज पाटील
नागरिक, माझोड.
.....................फोटो.........................
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ पासून लोहारापर्यंत २२ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खडे पडले असून, पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मांडोली, कोळासा, कसुरा, सोनगिरी, कळंबी, कळंबी महागाव, कळंबी खुर्द , डोंगरगाव व लोहारा इत्यादी गावांतील ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत. रस्त्यावरील खड्डे पाहून आणि चिखलातून वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे.या रस्त्यावर अनेकदा अपघाताचे प्रसंग घडत असून, अनेकांना कंबरदुखी व हाडांच्या आजाराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे.
-आम्रपाली खंडारे
सदस्य, जिल्हा परिषद.
............................................
७० रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार?
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून ७० रस्ते दुरुस्तीची कामे मंजूर आहेत. परंतु ग्रामीण भागातीलही जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे रखडलेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.