संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या केबिनची तोडफोड
By Admin | Updated: April 1, 2017 02:50 IST2017-04-01T02:50:51+5:302017-04-01T02:50:51+5:30
पोलिसांना केले पाचारण; पाण्यासाठी महिला, नागरिकांचा मोर्चा.

संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या केबिनची तोडफोड
हिवखेड(अकोला), दि. ३१- उन्हाळा लागत नाही, तोच येथील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत असून, या पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा चढविला. या मोर्चादरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे नागरिकांकडून ग्रामपंचायत कॅबिनच्या काचांची तोडफोड करण्यात आली.
हिवरखेड या गावाची लोकसंख्या जवळपास ४0 हजार असून, गावाला वारी येथील वान धरणातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतकडून मात्र गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. गावातील व अनेक भागात ग्रामपंचायतकडून सोडलेले पाणी मुबलक स्वरूपात मिळत नसल्यामुळे गावातील अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांंपूर्वी नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी २४ तास चालणारे पाण्याचे सार्वजनिक स्टँडपोस्ट दिले होते; मात्र काही दिवसांपूर्वी हे सार्वजनिक स्टँडपोस्टसुद्धा ग्रामपंचायतकडून बंद करण्यात आलेत. यामुळे नागरिकांना आणखीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठय़ाची पाणी कर वसुलीदेखील सक्तीने मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. पाणी मिळत नसल्यामुळे आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.