Village on river bank; but no water drink | नदीकाठी गाव...अन् पाणी नाही राव...!
नदीकाठी गाव...अन् पाणी नाही राव...!

ठळक मुद्देया गावात गेल्यागेल्याचरस्त्यावरील एका झिरपत्या व्हॉल्व्हमधून गावकरी ड्रम, टाकी, कॅनमध्ये गढूळ पाणी भरताना दिसले. दोनवाडा गावात गेल्यावर, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्याचा टँकर आलेला. टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची रांग लावली होती.गावात नळ आहेत; परंतु पाणी नाही. गावाला सध्या देवरीवरून टँकरने पाणीपुरवठा होतो.

- नितीन गव्हाळे

अकोला: खारपाणपट्ट्यातील घुसरवाडी, म्हातोडी, कासली आणि दोनवाडा गावांमध्ये भीषण पाणीटंचाई... गावे सधन; परंतु पाण्याचा टिपूसदेखील नाही. ग्रामपंचायतींचे पाण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. पाणी नसल्यामुळे गावातील युवकांचा वांधा झालेला... हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ...त्यामुळे लग्नासाठी कुणीच पोरीच देईना...अशी परिस्थिती. दोनवाडा हे सधन कास्तकारांचे गाव; परंतु नदीकाठी गाव...आणि पाणी नाही राव...! असे गावात येणारा पाहुणा आश्चर्याने विचारताना दिसून येतो. गावात नदी असूनही गावकºयांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो.
बुधवारी सकाळी लोकमत चमूने बारुल्यातील घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, कासली, दोनवाडा गावांमध्ये जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, हंडाभर पाण्यासाठी गावकरी रानोमाळ भटकंती करीत असल्याचे भीषण चित्र दृष्टीस पडले. घुसर गावाजवळून गेल्यावर काही अंतरावरच घुसरवाडी गाव दृष्टीस पडते. या गावात गेल्यागेल्याचरस्त्यावरील एका झिरपत्या व्हॉल्व्हमधून गावकरी ड्रम, टाकी, कॅनमध्ये गढूळ पाणी भरताना दिसले. गावात १५ दिवसांतून नळ आले तर आले नाही तर तेही येत नाही. पिण्यासाठी, वापरण्यासाठी पाणी तर लागतच ना! पाणी आणावे तरी कुठून? गावात पाण्याच्या टाक्या आहेत; परंतु त्यात पाण्याचा टिपूसदेखील नाही. ग्रामपंचायतचे पाण्यासाठी नियोजन नाही. पाणीपुरवठा योजना नाही. अशीच परिस्थिती म्हातोडी गावाची आहे. गावात पोहोचण्यापूर्वी मिनी ट्रॅक्टरवर पाच ते सहा ड्रम घेऊन काही युवक जाताना दिसले. घरी लग्नसमारंभ असल्यामुळे ते घुसरमध्ये पाणी आणायला जात होते. गावामध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पाण्यासाठी गावकºयांवर भटकंती करण्याची वेळ आल्याचे युवकांनी सांगितले. म्हातोडी गावात पोहोचल्यावर...गावातील महिला-पुरुष काही जवळच्याच लाखोंडा गावातील एका विहिरीवरून पाणी आणत असल्याचे दिसले. लाखोंडा गावात पोहोचल्यावर गावातील महिला, चिमुकल्या मुली हंडा घेऊन विहिरीवर पाणी भरताना दिसल्या. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, निवडणुका आल्या की, ग्रामपंचायतचे पदाधिकारी नुसती आश्वासने देतात. करीत काहीच नाही. गावात नळ आहेत; परंतु नळाला पाणी येण्याची गॅरंटी नाही. गावाच्या वेशीवर जुनी विहीर आहे. त्यामुळे भागते कसं तरी? अशी बोलकी प्रतिक्रिया महिला, युवकांनी दिली. कासली गावाची परिस्थिती काही वेगळी नाही. तेथून सहा किमी अंतरावरील दोनवाडा गावात गेल्यावर, ग्रामपंचायत कार्यालयात पाण्याचा टँकर आलेला. टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची रांग लावली होती. एकंदरीतच या गावांमधील ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणीच आणतंय.


गावात नदी अन् टँकरने पाणी!
दोनवाडा गाव पूर्णा नदीच्या काठावर आहे. पूर्वी पूर्णा नदी बारामाही वाहायची. तेव्हा गुराढोरांच्या पाण्याच्या प्रश्न नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. गावात नळ आहेत; परंतु पाणी नाही. गावाला सध्या देवरीवरून टँकरने पाणीपुरवठा होतो. दिवसभरात एका कुटुंबाला ३५ लीटरपेक्षा पाणी मिळत नाही. एवढी गंभीर परिस्थिती गावावर ओढावली आहे.


पंधरा दिवसात वारीचे पाणी येणार
दोनवाडा गावात पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे; परंतु ग्रामपंचायतने पाण्यासाठी पाइपलाइन मंजूर करून घेतली आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पंधरा दिवसात गावामध्ये वारीचे पाणी पोहोचणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

 


Web Title: Village on river bank; but no water drink
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.