विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचा ९ गडी राखून विजय

By Admin | Updated: November 29, 2014 21:51 IST2014-11-29T21:51:51+5:302014-11-29T21:51:51+5:30

निखिल भोसलेचे शानदार शतक; सचिन थोरातचे अर्धशतक.

Vijay Telang Smriti Inter School Cricket Tournament Akoli won by 9 wickets | विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचा ९ गडी राखून विजय

विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचा ९ गडी राखून विजय

अकोला: बुलडाणा संघाचा भरवशाचा सलामीचा फलंदाज निखिल भोसले याच्या शानदार शतकी खेळीने बुलडाणा संघाला बलाढय़ भंडारा संघावर ६ गडी राखून विजय मिळविता आला. भंडारा विरुद्ध बुलडाणा जिल्हा संघातील हा सामना अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शनिवारी खेळण्यात आला.
भंडारा संघाने प्रथम फलंदाजी करीत ५0 षटकात ९ बाद १७४ धावसंख्या उभारली. गणेश जोशीच्या ३९ धावांव्यतिरिक्त अन्य फलंदाज खेळपट्टीवर फारशी कामगिरी दाखवू शकले नाहीत. बुलडाणा संघाकडून रामेश्‍वर सोनोने याने २ गडी बाद केले. सतीश परिहार, संतोष आठवले, ऋषिकेश पवार, निखिल कुळकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात बुलडाणा संघाने ३७.५ षटकात ४ बाद १७७ धावा काढून सहज विजय मिळविला. सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या सुशील वानखडे याने केवळ ९ धावा काढल्या. त्याचा जोडीदार निखिल भोसले याने चौकार व षटकारांची आतषबाजी करून नाबाद १0६ धावा काढून, स्पर्धेतील पहिले शानदार शतक झळकाविले. प्रमोद वाघ केवळ ३ धावा काढून माघारी परतला. शुभम पाटीलने १७ धावांचे योगदान दिले. गोपाल निळे याने १ धाव दिली. सामन्यात पंच म्हणून संजय हिंगोलीकर, श्रीकांत बोपळे यांनी काम पाहिले. गुणलेखन नीलेश धापुडकर यांनी केले.
दुसरा सामना अरुण दिवेकर क्रीडांगण येथे गडचिरोली व अकोला जिल्हा संघात झाला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गडचिरोली संघाने ३६ षटकात सर्वबाद ८८ धावा काढल्या. अकोला संघाकडून प्रणव आठवले व अंकुश वाकोडे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. शारिक खान, मयूर बडे, नयन चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गडचिरोली संघाने दिलेले आव्हान अकोला संघाने अवघ्या ११ षटकात १ गडी गमवित ९२ धावा काढून सहज विजय मिळविला. सचिन थोरात याने नाबाद ५१ धावा काढल्या. प्रणव आठवले याने ३१ धावांचे योगदान दिले. प्रणव परनाटे याने नाबाद १ धाव दिली. गडचिरोलीच्या राजीक खतीब याने प्रणव आठवले याला त्रिफळाचित केले. सामन्यात पंच म्हणून प्रकाश सिंह, कपिल गिरी यांनी काम पाहिले. नीलेश लखाडे याने गुणलेखन केले.

Web Title: Vijay Telang Smriti Inter School Cricket Tournament Akoli won by 9 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.