पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:01:21+5:302014-07-28T00:13:43+5:30
अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा

पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अकोला : मध्य प्रदेश व अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना रविवारी जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश आणि अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सपन, पेढी, शहानूर, चंद्रभागा आणि पूर्णा या पाच नद्यांना रविवारी पूर आला. तसेच चांदूर बाजार जवळील विसरोळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आल्याने, पूर्णा नदीला पूर आला. पूर्णेला पूर आल्याच्या स्थितीत अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम पुलावरून पाणी वाहणार असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगितले.
त्याच प्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातही पूर्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. तसेच संबंधित प्रशासनाने व तलाठी यांनी मुख्यालयीच थांबावे, अशा सूचना बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील वान प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील इसरोळी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पाचे पाणी पूर्णा नदीच्या पात्रात येते. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाऊस जास्त झाल्यास अजूनही काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पात्रात वाढ होऊन काठावरील गावांना धोका पोहचू शकतो. तरी पूर्णा नदीकाठावरील संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा तसेच मलकापूर तालुक्यातील गावांसह गाळेगाव, मनसगाव, पहूरपूर्णा, भोनगाव, बोडगाव आदी गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी केले आहे.