पश्चिम विदर्भात दुधात भेसळीचे प्रमाण वाढले !
By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-13T00:45:29+5:302014-08-13T00:45:29+5:30
३८ पैकी दुधाचे १२ नमुने भेसळयुक्त

पश्चिम विदर्भात दुधात भेसळीचे प्रमाण वाढले !
अकोला : पश्चिम विदर्भातील दूध उत्पादन कमी झाल्याने दुधात भेसळीचे प्रमाण अधिक वाढले असून, अकोला जिल्ह्यात भेसळयुक्त दूध सर्रास विकले जात आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेल्या ३८ नमुन्यांपैकी १२ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यातील दुध उत्पादक संघाकडे येणार्या दुधाची आवक १६ हजार लिटर असून, यात अकोला जिल्ह्याचा वाटा १३२५ लिटर, म्हणजे केवळ १ टक्का आहे. अकोला जिल्हयाची दररोजची दुधाची गरज तीन ते साडेतीन लाख लिटर एवढी आहे. उर्वरित चार जिल्हयांची दुधाची गरज ही अकोला जिल्हयापेक्षा दुप्पट आहे. या सर्व जिल्हय़ातील दुग्धोत्पादन घटल्याने जिल्हा शासकीय दूध योजनेकडे येणारी दुधाची आवक कमी झाली आहे. बाजारात चांगले दर मिळतात म्हणून अनेक दूध उत्पादक थेट खासगी दूध विक्रेत्यांकडे दुधाची विक्री करतात. या दुधाची तपासणी न करताच ते ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. जिल्हय़ाबाहेरील येणारे विविध कंपन्यांचे दूध शुद्ध आहे की अशुध्द , याची तांत्रिक माहिती ग्राहकांना नसल्याने अप्रमाणित दुधाचे सेवन केले जात आहे. दरम्यान, अन्न व प्रशासन विभागाने अकोला आणि वाशिमच्या सीमा भागातील दुधाचे ३८ नमुने घेतले आहे. त्यापैकी १२ नमुन्यांमध्ये भेसळ आढळली. दरम्यान, या अगोदर दोन प्रकरणांमध्ये अप्रमाणित दूध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली होती. आता दूध भेसळीच्या या १२ प्रकरणांमध्ये काय कारवाई होते, हे स्पष्ट होणार आहे.