विदर्भात २६ हजार रुग्णांच्या दिमतीला ‘१0८’ !
By Admin | Updated: November 12, 2014 00:07 IST2014-11-12T00:07:35+5:302014-11-12T00:07:35+5:30
आपत्कालीन रुग्णवाहिकेला रुग्णांचा उदंड प्रतिसाद.

विदर्भात २६ हजार रुग्णांच्या दिमतीला ‘१0८’ !
ब्रम्हानंद जाधव/मेहकर(बुलडाणा)
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्याकरीता राज्य सरकारने सुरू केलेल्या अत्याधुनिक १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला विदर्भात उदंड प्रतिसाद लाभत असून, आपत्कालीन रुग्णवाहिका कार्यरत झाल्यापासून आतापर्यंत विदर्भातील तब्बल २६ हजार २७२ रुग्णांच्या दिमतीला, ही रुग्णवाहिका धावली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा पुरविण्याकरीता, राज्य सरकारने राज्यभर आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. ही सेवा २६ जानेवारी २0१४ पासून सुरू झाली आहे. या उपक्रमातील रुग्णवाहिका जागतिक दर्जाच्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत १0८ क्रमांक फिरविल्यास अवघ्या २0 ते ३0 मिनिटात सुसज्ज रुग्णवाहिका घटनास्थळी उपलब्ध होते. सध्या राज्यभर १0८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका धावत आहेत. दिवसाचे २४ तास सेवा पुरवित असलेल्या या रुग्णवाहिकांसाठी दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी आहेत.
विदर्भात आतापर्यंत २६ हजार २७२ रुग्णांनी या आपत्कालीन रुग्णवाहिकेचा लाभ घेतला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात २,१७७, अमरावतीमध्ये ४,६६९, भंडार्यात १,३५0, बुलडाण्यात २९७0, वाशिममध्ये १,३४२, यवतमाळमध्ये ३,७३३, चंद्रपुरात १,६१३, गडचिरोलीत ५८४, गोंदीयामध्ये २,0४८, नागपुरात ४,९0७, तर वर्धा जिल्ह्यात ८७९ रुग्णांनी या आपत्कालीन रुग्णसेवेचा लाभ घेतला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहीका रुग्णांच्या सेवेसाठी मोफत हजर होत असल्याने, गोरगरीब रुग्णांसाठी १0८ हा दूरध्वनी क्रमांक एकप्रकारे जीवनदायीच ठरत आहे.