विदर्भाला मिळाले पहिले तणनाशक केंद्र!

By Admin | Updated: December 22, 2014 00:22 IST2014-12-22T00:22:14+5:302014-12-22T00:22:14+5:30

अकोल्याच्या डॉपंदेकृवि मध्ये होणार नवे संशोधन.

Vidarbha got the first herbicide center! | विदर्भाला मिळाले पहिले तणनाशक केंद्र!

विदर्भाला मिळाले पहिले तणनाशक केंद्र!

राजरत्न सिरसाट/अकोला : पिकातील उपद्रवी तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी अलिकडच्या काही वर्षात तणनाशकांचा वापर वाढला आहे; परंतु शास्त्रीयदृष्ट्या वापर होत नसल्याने पिकांवर दुष्परिणाम होत आहेत. यावर संशोधन करू न शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पहिले नवे तणनाशक संशोधन केंद्र मिळाले आहे.
कृषी क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. हवामान बदल, शेतीसमोरील आव्हाने या विषयावर कृषी विद्यापीठाकडून नवे संशोधन, तंत्रज्ञान उपलब्ध करू न देण्यात आले आहे; परंतु अलिकडे मनुष्यबळाच्या अभावामुळे पीक नियोजन करणे शेतकर्‍यांना अवघड होत आहे. पिकाचे नियोजन करताना, पिकातील उपद्रवी तणांचा नायनाट करणे शेतक र्‍यांसमोर मोठे आव्हान आहे. या तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी विविध तणनाशकांचा वापर करीत आहेत. या तणाच्या बंदोबस्तासाठी यांत्रिकीकरण किंवा मशागतीय पद्धतीचा वापर करतात; परंतु वाढते मजुरीचे दर, त्यांची कार्यक्षमता आणि मजुरांची जाणवणारी कमतरता, यामुळे या परंपरागत पद्धतीने तणाचे प्रभावीपणे नियंत्रण करणे कठीण झाले आहे. म्हणूनच तण नियंत्रणाच्या एकात्मिक पद्धतीबरोबरच रासायनिक तणनाशकांच्या वापरासाठी मोठा वाव असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन आढावा सभा, चर्चासत्रात तणनियंत्रणाच्या शिफारसी केल्या होत्या आणि विदर्भातील शेतकर्‍यांना तणनाशक वापराबाबत संशोधन व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन (आयसीएआर) परिषदेकडे प्रस्ताव सादर केला होता. आयसीएआर अंतर्गत कार्यरत जबलपूर येथील तण विज्ञान संशोधन संचालनालयाने शनिवारी हे संशोधन केंद्र मंजूर केले आहे. यामुळे विदर्भाला प्रथम आणि राज्याला दुसरे तणनाशक संशोधन केंद्र मिळाले आहे.
तणांचा शास्त्रीयदृष्ट्या नायनाट करण्यासाठी आयसीएआरने या कृषी विद्यापीठाला नवे तण संशोधन केंद्र दिले आहे. हा कृषी विद्यापीठावर टाकलेला मोठा विश्‍वास आहे. या माध्यमातून विदर्भ, राज्यातील प्रमुख पिकांतील तणांवर आता प्रभावीपणे उपाययोजना करता येतील, डॉ. पदेकृषीचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले यांनी सांगीतले.

Web Title: Vidarbha got the first herbicide center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.