विदर्भात सरासरीच्या १३ टक्के कमी पाऊस!

By Admin | Updated: July 25, 2014 00:52 IST2014-07-25T00:52:57+5:302014-07-25T00:52:57+5:30

पश्‍चिम विदर्भातील काही तालुक्यात ५ सेंमी पाऊस; चित्र अजूनही निराशाजनकच!

Vidarbha average 13 percent less rain! | विदर्भात सरासरीच्या १३ टक्के कमी पाऊस!

विदर्भात सरासरीच्या १३ टक्के कमी पाऊस!

अकोला : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सर्वदूर पडलेल्या संततधार पावसाने विदर्भातील सरासरी पावसात वाढ झाली आहे. विदर्भात सरासरी पावसाच्या ३३ टक्के तूट होती. पावसाच्या दमदार हजेरीने ती आता १३ टक्क्यांवर आली आहे. सर्वाधिक पाऊस पूर्व विदर्भातच पडला. पश्‍चिम विदर्भातही पावसाने हजेरी लावली असली तरी, जलसाठय़ात मात्र वाढ झाली नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास कायमच आहे. येत्या ४८ तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
विदर्भात १४ जुलैपर्यंत सरासरीच्या ६६ टक्के कमी पाऊस होता. १५ जुलै रोजी आलेल्या पावसाने ही तूट ३३ टक्क्यांनी कमी झाली. मंगळवार, २३ जुलै रोजी दिवसभर पडलेल्या पावसामुळे सरासरी तूट आणखी कमी झाली. आता विदर्भातील सरासरी पावसाची तूट १३ टक्क्यांवर आली आहे; मात्र यामध्ये पूर्व विदर्भातील पावसाचे प्रमाण अधिक आहे.
विदर्भात १ जून ते २४ जुलै रोजी सकाळी ८.३0 वाजतापर्यंत ३५६.३३ मिमी पावसाची नोंद झाली. पिकांसाठी हा पाऊस पोषक असला तरी पिण्याच्या पाण्याचे चित्र मात्र अजूनही चिंताजनक आहे. २४ जुलै रोजी सकाळी ८.३0 वाजता संपलेल्या चोवीस तासात पश्‍चिम विदर्भातील जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक ८ सेमी पावसाची नोंद झाली आहे. संग्रामपूर, तेल्हारा, पातूर, चिखली व मलकापूर या तालुक्यात प्रत्येकी ५ सेमी पाऊस झाला.
आकोट, मोताळा, नांदुरा, कारंजा लाड, शेगाव, बाळापूर, खामगाव, बाश्रीटाकळी या तालुक्यांमध्ये ४ सेमी पाऊस झाला. मूर्तिजापूर, अकोला, मंगरू ळपीर, मालेगाव येथे ३ सेमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. मेहकर, देऊळगाव राजा, लोणार रिसोड, वाशिम या ठिकाणी केवळ २ सेमी तर सिंदखेड राजा, मानोरा तालुक्यात केवळ १ सेमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Vidarbha average 13 percent less rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.