दिग्गजांची एन्ट्री, प्रस्थापितांची कसोटी!
By Admin | Updated: September 28, 2014 01:59 IST2014-09-28T01:59:32+5:302014-09-28T01:59:32+5:30
अकोला जिल्ह्यातील विद्यमान आमदारांपुढे आव्हान; नेत्यांची नवीन पिढी रिंगणात.

दिग्गजांची एन्ट्री, प्रस्थापितांची कसोटी!
मनोज भिवगडे / अकोला
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी २५८ अर्ज दाखल केले. युती आणि आघाडी तुटल्याने जिल्ह्यातील दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळाली. दिग्गजांच्या एंट्रीने प्रस्था िपतांपुढे आव्हान उभे झाले असून, सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने नेत्यांची नवीन पिढीही निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी २ भाजप आणि २ भारिप-बमसंच्या तर एक मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. २00९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. यावेळी मात्र युती आणि आघाडीतील सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. काँग्रेस, राकाँ, शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत जागा वाटपामुळे ज्या पक्षांच्या नेत्यांना संधी मिळत नव्हती, त्यांनाही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले. अकोला पश्चिममधून २0 वर्षांपासून आमदार असलेले भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेचे दिग्गज नेते गुलाबराव गावंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय राकाँकडून विजय देशमुख आणि काँग्रेसकडून उषा विरक यांना उमेदवारी मिळाली आहे. अकोला पूर्वमधून भारिपचे हरिदास भदे दहा वर्षांंपासून आमदार आहेत. त्यांना पक्षाने तिसर्यांदा उमेदवारी दिली आहे. यावेळी मात्र त्यांच्यापुढे आमदार गो पीकिसन बाजोरिया यांच्यासह राकाँचे शिरिष धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. सुभाष कोरपे यांच्यासह अ पक्ष विजय मालोकार आणि डॉ. पुरुषोत्तम दातकर यांचे आव्हान राहणार आहे. बाजोरिया आणि मालोकार या दिग्गजांसोबतच शिरिष धोत्रे आणि सुभाष कोरपे, दातकर हे दुसर्या फळीतील नेते प्र थमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आकोटमधून आमदार संजय गावंडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यापुढे भाजपचे दिग्गज प्रकाश भारसाकळे यांचे आव्हान आहे. राकाँचे राजू बोचे आणि काँग्रेसचे नव्या पिढीतील नेते महेश गणगणे यांनीही विद्यमान आमदाराविरुद्ध दंड थोपटले आहेत. बाळापूरमध्ये भाजपचा गोंधळ सुरूच आहे. एबी फॉर्म देतानाही जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह शिवसंग्रामचे संदीप पाटील या दोघांचेही नाव टाकण्यात आले. त्यामुळे नेमका भाजपचा उमेदवार कोण, याबाबतचा संभ्रम अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही कायम होता. येथून विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे नतिकोद्दिन खतीब यांना रिंगणात उतरविण्यात आले. काँग्रेसची तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली तर माळी समाजातील प्रकाश लक्ष्मणराव तायडे यांना काँग्रेससोबतच राकाँची उमेदवारीही मिळाली नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून अखेर उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. मूर्तिजापूर मतदारसंघात विद्यमान हरीश पिंपळे यांना भाजपने पुन्हा रिंगणात उतरविले. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे यांना उमेदवारी दिली आहे.