‘नो पार्किंग’मधील चारचाकी वाहनांना लागणार ‘जॅमर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:43 PM2019-05-18T12:43:25+5:302019-05-18T12:47:42+5:30
आता बेशिस्त चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांच्या वाहनांना जॅमर लावण्यात येणार आहे.
अकोला: अकोलेकर वाहन चालकांच्या बेशिस्त वाहतुकीला पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही वाहन चालक वठणीवर येत नाहीत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर जागा मिळेल अशा ठिकाणी चालक अस्ताव्यस्त वाहने पार्किंग करतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आता पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आता बेशिस्त चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांच्या वाहनांना जॅमर लावण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांवर केलेले अतिक्रमण, त्यात बेशिस्त वाहतूक, मिळेल त्या जागेवर अस्ताव्यस्त पद्धतीने वाहन, दुचाकी उभी करण्याची बेकिरी, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर अनेकजण वाट्टेल त्या ठिकाणी कार पार्किंग करतात. आॅटोरिक्षा चालक तर रस्त्यावर कुठेही अचानक थांबतात आणि रिक्षा उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मेट्रो शहरांमध्ये चालकाने नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास, त्याचे वाहन उचलून नेल्या जाते; परंतु अकोला शहरात तशी सुविधा आतापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. अखेर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी शहराची गरज आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, जॅमर लावण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही वाहतूक नियंत्रण शाखेला जॅमर उपलब्ध करून दिले. सद्यस्थितीत पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेला सहा जॅमर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शुक्रवारपासून शहरातील काही रस्त्यांवर जॅमर लावण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी राबविली. शहरातील रस्त्यावर पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर किंवा नो पार्किंग झोनमध्ये उभ्या चारचाकी वाहनांना पोलिसांनी जॅमर लावले होते. त्यामुळे अनेक कार चालकांची गोची झाली होती. आता ही मोहीम दररोज राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अकोलेकरांना वाहने सांभाळा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
१८ चारचाकी वाहनांवर कारवाई
शुक्रवारी रस्त्यांवरील पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर आणि नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या १८ चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत चाकांना जॅमर लावले. त्यामुळे कार चालकांचे चांगलेच वांधे झाले होते. अखेर पोलिसांकडे ३६०० रुपये दंड भरून जॅमर काढण्याची वेळ चालकांवर आली होती.
रस्त्यांवरील पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर आणि नो पार्किंग झोनमध्ये चारचाकी वाहने उभे करणाऱ्या चालकांवर शुक्रवारी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियंत्रण शाखेला सहा जॅमर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता चारचाकी, दुचाकी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
-विलास पाटील, पोलीस निरीक्षक
वाहतूक नियंत्रण शाखा.