गुढीपाडव्यापेक्षा जास्त झाली वाहन विक्री
By Admin | Updated: April 1, 2017 03:06 IST2017-04-01T03:06:27+5:302017-04-01T03:06:27+5:30
सवलतीच्या दराचा उचलला फायदा

गुढीपाडव्यापेक्षा जास्त झाली वाहन विक्री
अकोला, दि. ३१- न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. ही बंदी १ एप्रिलपासून लागू होत असल्याने शेवटच्या दिवशी जवळपास ६६0 वाहनांची विक्री झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी पासिंगसाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विकल्या जाणार्या वाहनांपेक्षाही अधिक विक्री गेल्या दोन दिवसांत झाली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरुवारी रात्रीच अनेकांनी शोरूमकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वाहनांचे शोरूम सुरू होते. दोन दिवसांत विक्री झालेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक वाहने हे बीएस-३ दर्जाची आहेत.
शुक्रवारी सकाळी वाहन खरेदीसाठी नागरिकांनी पुन्हा शोरूमकडे धाव घेतली. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या मुहूर्तावर नसेल इतकी गर्दी सवलतीच्या दरातील वाहन खरेदीसाठी दिसून आली. अकोला शहरातील दुचाकी विक्रीच्या विविध शोरूममधून गुढीपाडव्याला २00 वाहने विकल्या गेली होती. गेल्या दोन दिवसांत तब्बल ५00 वाहने विकल्या गेल्याने मुहूर्ताचाही विक्रम मोडीत निघाला आहे. हेच वाहन घेऊन नोंदणीसाठी आरटीओ कार्यालय गाठण्यात आले. त्याकरिता सर्वच डीलरकडून आरटीओच्या कॅश काउंटरवर वाहनांची यादी व नोंदणी शुल्क जमा करण्यात आले. दुपारी २ वाजता बंद होणारे आरटीओचे कॅश काउंटर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. हीरोच्या १५0, होंडाच्या २२५ दुचाकी, टीव्हीएसच्या २३५, तर इतर कंपन्यांची ५0 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.