varhadi Literature Meeting in Amravati | अमरावतीत ४ जानेवारी रोजी तिसरे अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलन
अमरावतीत ४ जानेवारी रोजी तिसरे अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलन

अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. उद्धव शेळके साहित्य नगरी अमरावती मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्व. मनोहर तल्हार विचारपीठ दृक श्राव्य सभागृहात शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी करण्यात येणार आहे. तिसऱ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावतीचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहणार असून संमेलनाच्या संमेलन अध्यक्ष पदी जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक नरेंद्र इंगळे यांची निवड झाली आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता होणार आहे. उदघाटन सत्राला मावळते संमेलन अध्यक्ष प्रकाश पोहरे, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष शिरीष धोत्रे, जेष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे, मुंबईच्या वऱ्हाडी साहित्यिका अनुराधाताई धामोडे, दैनिक सकाळ अकोला वऱ्हाड आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, प्रा. सदाशिव शेळके, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे अध्यक्ष श्याम ठक आणि गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा. मोना चिमोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन सत्राचे संचालन डॉ. हेमंत खडके करणार आहेत. साहित्य संमेलनामध्ये 'संस्कृती संवर्धनासाठी बोली भाषेचे उपयोजन' या विषयावर परिसंवाद, वऱ्हाडी कथाकथन, कवी संमेलन, वऱ्हाडरत्न पुरस्कार वितरण, वऱ्हाडातील दुर्मिळ वस्तूंची वाम प्रदर्शनी, कु. पल्लवी संजय नेमाडे यांची चित्र प्रदर्शनी अशा कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यावेळी संमेलन विशेषांक वाणीचा हूरळा, युवा समीक्षक प्रा. महादेव लुले यांचा निवडक अर्वाचीन वऱ्हाडी कवितांवरील समीक्षा ग्रंथ 'रई', जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक शिवलिंग काटेकर यांचा 'वऱ्हाडधन' या वऱ्हाडी शब्दकोशाची पाचवी आवृती, साहित्यिक दयाराम निंबोळकर यांची एकांकिका 'सात बारा कोरा', कवी अरुण विघ्ने यांचा 'जागल' कवितासंग्रह अशा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचाचा मानाचा 'वऱ्हाड रत्न पुरस्कार २०२०' महेंद्र राऊत मुंबई तथा डॉ. विलास सवई यांना प्रदान करण्यात येणार आहे. अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिका देवका ताई देशमुख यांना वऱ्हाडी जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यलाई पुरस्कार २०२० हा वऱ्हाडी बोली भाषेत उल्लेखनीय लिखाण करणारे युवा साहित्यिक उज्वल विभुते यांना प्रदान करण्यात येणार आहे. समारोपीय सत्रामध्ये संमेलनाचा समारोप संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आबासाहेब कडू, ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, डॉ. ममता इंगोले, दयाराम निंबोळकर, तेजस्वी बारब्दे यांच्या उपस्थितीत होणार आहे. वऱ्हाडी बोली भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाने या आधी दोन वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. दुसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाला मसाला किंग धनंजय दातार दुबई यांच्यासह भारत गणेशपुरे या कलावंताची उपस्थिती लाभली होती. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचा 'चिरांगण' हा वऱ्हाडी दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होत असतो. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचातर्फे 'कानोसा' हे वऱ्हाडी न्युज पोर्टल तथा 'वऱ्हाडधन' हे वऱ्हाडी शब्दकोश अँप चालवले जाते. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच कथाकथन कार्यशाळा, वऱ्हाडी लेखन कार्यशाळा, प्रातिनिधिक कवितासंग्रह, संवाद लेखन कार्यशाळा, बोली भाषेवर आधारित चर्चासत्रे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. तिसऱ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलना च्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. श्याम ठक यांची कार्याध्यक्षपदी तर डॉ. मोना चिमोटे यांची आयोजन समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रा. मनोज तायडे, डॉ. प्रा. माधव पुठवाड, डॉ. प्रा. हेमंत खडके, डॉ. प्रा. प्रणव कोलते, पुष्पराज गावंडे, सदाशिव शेळके, दयाराम निंबोळकर, रवींद्र दळवी, महादेव लुले, निलेश कवडे यांच्यासह अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचाचे सदस्य परिश्रम घेत आहेत. अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते. अशा अंबानगरीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तर्फे वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वऱ्हाडी बोलीभाषा संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने विद्यापीठा चे साहित्यिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. या वऱ्हाडी साहित्य संमेलनाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घेण्याचे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी विभाग तथा अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचा च्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: varhadi Literature Meeting in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.