वीज ग्राहकांच्या तक्रारींचे होणार निवारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:47 IST2017-07-30T13:47:05+5:302017-07-30T13:47:31+5:30

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे होणार निवारण!
अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याकरिता व त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने बुधवार, २ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अकोला मंडळातील सर्वच तालुक्यांतील उपविभागीय कार्यालयामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये अकोला शहरातील ग्राहकांकरिता विद्युत भवन येथील ग्राहक सुविधा केंद्र येथे, अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, अकोट येथील उपविभागीय कार्यालय परिसरात तर तेल्हारा उपविभागातील ग्राहकांकरिता हिवरखेड शाखा कार्यालय येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये वीज बिल दुरुस्ती, घरगुती व इतर वर्गवारींची नवीन वीज जोडणी, वाढीव भार, नावामधील बदल-दुरुस्ती, मोबाइल क्र. नोंदणी तसेच इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन ग्राहकांना देण्याकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथे ग्राहकांना अर्ज विनामूल्य उपलब्ध राहणार असून, ग्राहकांनी त्यांच्या तक्रारीसंदर्भातील कागदपत्रे व वीज देयके सोबत आणावीत. शिबिराच्या दिवशी संबंधित कामाकरिता विभागातील व उपविभागातील संबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून यासंदर्भात मार्गदर्शन करतील. ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या अकोला मंडळाकडून करण्यात आले आहे.