पतंग उडविण्यासाठी तारेचा वापर, विजेच्या धक्क्याने एक जखमी

By Admin | Updated: January 16, 2016 02:12 IST2016-01-16T02:12:29+5:302016-01-16T02:12:29+5:30

अकोल्यातील घटना, युवकाच्या जिवघेण्या प्रयोगाने पोलीसही अवाक्

Use of the wire to blow a kite, one injured by electric shock | पतंग उडविण्यासाठी तारेचा वापर, विजेच्या धक्क्याने एक जखमी

पतंग उडविण्यासाठी तारेचा वापर, विजेच्या धक्क्याने एक जखमी

अकोला : एका युवकाने पतंग उडविण्यासाठी बारीक तारेचा वापर केल्याने या तारेतून वीज प्रवाहीत होऊन एक पादचारी युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी अकोल्यातील जुने शहरात घडली. पतंग उडविण्यासाठी वापरलेली तार विद्युत तारेमध्ये गुंतल्यानंतर त्यावर दुसर्‍या युवकाचा पाय पडल्याने तो गंभीररीत्या भाजला. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी पतंगला तार बांधणार्‍या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आपली पतंग कापल्याच जाऊ नये, यासाठी चायनिज मांजासह घातक मांजाचा वापर करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत; मात्र अकोल्यातील जुने शहरातील शिवनगर येथील रहिवासी प्रमोद प्रकाश चौधरी (२६) या युवकाने पतंग उडविण्यासाठी अफलातून प्रयोग करीत चक्क बारीक तारेचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या युवकाने पतंगला २0 फूट लांबीची बारीक तार बांधली. या तारेला मांजा बांधून पतंग उडविण्याचा प्रयत्न त्याने केला. युवकाचा हा प्रयत्न यशस्वी झाला. त्याची पतंग बराच वेळ पतंग आकाशात उडाली; मात्र खाली आल्यानंतर पतंगला बांधलेली बारीक तार महावितरणच्या विद्युत तारेमध्ये गुंतली आणि पतंगीची तार लांब असल्याने तिचा काही भाग जमिनीला टेकला. पतंगीच्या बारीक तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाल्याचा प्रकार प्रमोदच्या लक्षात येताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. नेमके त्याचवेळी रावनगर येथील रहिवासी रूपेश मधुकर जामनिक (२५) हा तेथून शौचविधीसाठी जात असताना त्याचा पाय तारेवर पडला. त्यामुळे विजेचा धक्का लागल्याने तो गंभीररित्या भाजला गेला. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रूपेशला तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी रूपेश जामनिक यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी प्रमोद चौधरी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २९0, ३३७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

खेळ कुणाचा अन् शिक्षा कुणाला!
पतंग उडविण्याच्या नादात कोणत्याही थराला जाणार्‍या युवकाच्या या प्रयोगामुळे दुसरा एक युवक गंभीररीत्या भाजला गेला आहे. त्यामुळे खेळाचा आनंद कुणाला आणि शिक्षा दुसर्‍यालाच झाल्याची प्रतिक्रिया यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्यांनी व्यक्त केली.

Web Title: Use of the wire to blow a kite, one injured by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.