रोहित्रात तारांचा स्पर्श होऊ नये यासाठी चपलेचा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:55+5:302021-02-05T06:14:55+5:30
मूर्तिजापूर: तालुक्यातील ग्राम पोही येथे कृषिपंपासाठी वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राची दुरवस्था झाली आहे. रोहित्रातील सर्व फ्यूज तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे ...

रोहित्रात तारांचा स्पर्श होऊ नये यासाठी चपलेचा वापर!
मूर्तिजापूर: तालुक्यातील ग्राम पोही येथे कृषिपंपासाठी वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राची दुरवस्था झाली आहे. रोहित्रातील सर्व फ्यूज तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून रोहित्राची दुरुस्ती न करता रोहित्रात तारांचा स्पर्श होऊ नये, यासाठी चक्क चपलेचा वापर केल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
पोही येथील कृषिपंपासाठी वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रात चपलेचा वापर केल्या जात असल्याने मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत फोटो काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर परिस्थिती आणखी कठीण असल्याचे ग्रामस्थांकडून बोलल्या जात आहे. रोहित्रात सतत बिघाड होत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. रोहित्र रस्त्यावर असल्याने या मार्गाने जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य नसल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. रोहित्रातील तार एकमेकांना घर्षण होऊन आग लागण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत, तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
----------------------------------------------------------
कृषिपंपासाठी वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रोहित्रातील फ्यूज तुटले असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत तक्रारी देऊनही दखल घेतल्या जात नाही. रस्त्यालगत रोहित्र असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे.
-किशोर नाईक, सरपंच, ग्राम पोही, ता.मूर्तिजापूर.