फळ रोपं जगविण्यासाठी पीडीकेव्ही मटका सिंचन मॉडेलचा वापर!
By Admin | Updated: April 16, 2016 02:07 IST2016-04-16T02:07:36+5:302016-04-16T02:07:36+5:30
कृषी विद्यापीठातील फळझाडांना मटक्याचा आधार.

फळ रोपं जगविण्यासाठी पीडीकेव्ही मटका सिंचन मॉडेलचा वापर!
राजरत्न सिरसाट/अकोला
विदर्भातील पाणीटंचाई आणि तापमानाचा वाढता पारा बघता शेतकर्यांना नवीन फळझाडे जगविण्यासाठी प्रयत्न करावे लागत असून, फळझाडं जगविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या पीकेव्ही मटका सिंचन मॉडेलचा आधार वाटत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या पद्धतीने पाणी देऊन फळझाडे जगविण्यात येत आहेत. या मॉडेलला राज्यस्तरीय संशोधन सल्लागार संशोधन आढावा समितीने मान्यता दिली आहे.
विदर्भात मुख्यत्वे अकोला जिल्हय़ात तापमान प्रचंड वाढले असून, पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पिण्यासाठीच पाणी नसल्याने फळझाडांना पाणी देणार कोठून, असा प्रश्न कृषी विद्यापीठासह शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. दोन वर्षाआतील फ ळझाडांना नियमित पाणीपुरवठय़ाची गरज असल्याने कृषी विद्यापीठाने या मॉडेलचा वापर करू न फळझाडे जगविण्यात यश प्राप्त केले आहे. या मॉडेचा वापर केल्यास ठिबक सिंचनापेक्षाही उपयुक्त आहे. जांभूळ, सीताफळ, करवंद आदी झाडांना या मटका सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आठ दिवसातून एकदाच पाच लीटर पाणी लागते. बहूद्देशीय फळझाडांना मात्र पंधरा दिवसातून एकदा मटके भरावे लागते. नवीन झाडांना खंड नको असल्याने काळजी घ्यावी लागते, तीच काळजी विदर्भातील शेतकर्यांना घ्यावी लागत आहे. संत्रा झाडांना आठवड्यातून दोनदा पाणी द्यावे.
मटका सिंचन पद्धत
पाच लीटर पाणी सामावेल असे मटके घेऊन त्या मटक्याच्या आत, बाहेर पांढरा चुना लावावा लागतो. मटक्यांच्या बुडाला ड्रीलने लहानसे छिद्र पाडावे. या छिद्रातून चिंधी आतल्या बाजूने ओढावी. हे मटके झाडांच्या १५ से.मी. अंतरावर आळा करू न जमिनीत गाडावे लागते. मटक्याचे तोंड केवळ वर असावे. तत्पूर्वी त्याखाली गवताचे आच्छादन करावे. या प्रयोगामुळे ठिबक संचापेक्षाही उत्तमरीत्या झाडांना पाणी मिळून झाडांचे या प्रखर उन्हाळ्य़ात संगोपन केले जाते.