महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:00 IST2020-07-26T11:00:46+5:302020-07-26T11:00:53+5:30

अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

Urges to Municipal corporation; Still illegal construction continues in Akola | महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच!

महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मनपा प्रशासनाने भूखंडाचे उपविभाजन न करताच मालमत्ताधारकाला इमारतीच्या बांधकामाची परवानगी बहाल केली. याविरोधात दाद मागणाऱ्या तक्रारकर्त्याने आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी यांच्यासह महापालिका प्रशासनाचे उंबरठे झिजवले. तरीही अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता रामदासपेठ भागातील सर्वसामान्य तक्रारकर्त्याला न्याय मिळेल का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
रामदासपेठ परिसरातील गड्डम प्लॉटस्थित मंगल कार्यालयाच्या बाजूला प्रवीणचंद्र भवानीशंकर त्रिवेदी यांनी नझूल शीट क्रमांक ६२ भूखंड क्रमांक ९/४७ या जागेवर मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार गिरीराज यशवंत राव, गौरीशंकर कलशेट्टी व अ‍ॅड. आनंद कलशेट्टी यांनी मनपा प्रशासनाकडे केली. एकाच भूखंडावर दोन वेगवेगळ्या मालमत्ताधारकांना बांधकाम करावयाचे असल्यास भूखंडाचे उपविभाजन करणे अत्यंत गरजेचे आहे. भूखंडाचे उपविभाजन मंजूर नसतानाही प्रवीणचंद्र त्रिवेदी यांनी बांधकामाला सुरुवात केल्याची बाब पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यावरून क्षेत्रीय अधिकारी जाधव यांनी प्रवीणचंद्र त्रिवेदी यांना नोटीस बजावली आहे. तसेच नकाशाव्यतिरिक्त समोरील समास अंतरामध्ये जिन्याचे बांधकाम केले असून, ते तातडीने हटविण्याचे निर्देश दिले.
अन्यथा मनपाच्या स्तरावर कारवाई करण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला. महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही मालमत्ताधारक त्रिवेदी यांच्याकडून बांधकाम सुरूच असल्याची तक्रार गौरीशंकर कलशेट्टी यांनी प्रशासनाकडे केली आहे. तरीही बांधकाम बंद होत नसल्याचे दिसून येत आहे.


लोकप्रतिनिधींनी निर्देश दिल्यावरही कारवाई नाहीच!
भूखंडाचे नियमानुसार उपविभाजन न करताच नियमापेक्षा जास्त बांधकाम केले जात असल्याप्रकरणी तक्रारकर्ते गौरीशंकर कलशेट्टी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यावर संबंधित लोकप्रतिनिधीने मनपातील सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात अवगत केले. लोकप्रतिनिधींनी निर्देश दिल्यावरही अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही, हे येथे उल्लेखनीय.


नगररचना विभागाला इमारतीच्या मोजमापाचे निर्देश देत बांधकामकर्त्याला नोटीस दिली होती. त्यानंतरही बांधकाम सुरू असेल तर कारवाई केली जाईल.
- दिलीप जाधव,
क्षेत्रीय अधिकारी, पूर्व झोन

Web Title: Urges to Municipal corporation; Still illegal construction continues in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.