उपवर मुलीचा आग्रह; आंदणात मिळणार शौचालय
By Admin | Updated: May 15, 2015 01:43 IST2015-05-15T01:43:58+5:302015-05-15T01:43:58+5:30
ग्रामीण भागातील उपवर मुलीने आंदण म्हणून शौचालयाचा धरला आग्रह.

उपवर मुलीचा आग्रह; आंदणात मिळणार शौचालय
राजेश्वर वैराळे / बोरगाव वैराळे (जि. अकोला): भौतिक सुखाच्या कोणत्याही वस्तूची मागणी न करता ग्रामीण भागात राहणार्या उपवर मुलीने आंदण म्हणून तयार शौचालय (रेडिमेड) मिळावे, असा आग्रह धरून स्वच्छतेचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. तिच्या या स्तुत्य पायंड्याला कुटुंबीयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तिला आंदणात रेडिमेड शौचालय देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लग्नसोहळा १५ मे रोजी अकोला जिल्ह्याच्या बाळापूूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) येथे होणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ह्यजहॉँ सोच वहॉँ शौचालयह्ण हे घोषवाक्य आचरणात आणणार्या या उपवर मुलीचे नाव आहे चंदा ऊर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड). केंद्र सरकारतर्फे सध्या स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास न बसता शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका महिलेने सौभाग्याचे लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधले होते. हे स्फूर्तिदायक उदाहरण ताजे असतानाच आता आंदणात रेडिमेड शौचालय मिळण्यासाठी मुलीने आग्रह धरल्याचे समोर आले आहे. दिलीप वासुदेवराव गाळखे यांच्या चंदा या मुलीचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मोजर येथील कृष्णकुमार माकोडे यांच्याशी १५ मे रोजी कारंजा रमनाजपूर (नया अंदुरा) येथे होणार आहे. तिला आंदणात रेडिमेड शौचालय देण्यात येणार आहे.