जिल्ह्यात गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच अवकाळी पावसाची रिपरिप सुरू असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून, गव्हावर मर रोगाचे आक्रमण झाले आहे. अवकाळी पावसाने हरभऱ्याची फुलगळ झाल्याने यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
---------------------
शेतीला फटका
यंदा पाऊस जोरदार झाल्याने विहिरी, कूपनलिकांना पाणी उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा बहरलेला असताना मंगळवारी अचानक आलेला पाऊस अळींना निमंत्रण देणारा ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांना फटका बसला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.