भटक्या कुत्र्यांचा अघोरी बंदोबस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:13+5:302021-02-05T06:15:13+5:30
भटक्या कुत्र्यांचा हैदोस कमी करण्यासाठी महापालिकेकडून मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहीम राबविल्या जात आहे. कुत्र्यांना पकडण्याची पद्धत कमीत कमी वेदनादायी ...

भटक्या कुत्र्यांचा अघोरी बंदोबस्त!
भटक्या कुत्र्यांचा हैदोस कमी करण्यासाठी महापालिकेकडून मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहीम राबविल्या जात आहे. कुत्र्यांना पकडण्याची पद्धत कमीत कमी वेदनादायी असावी, असे असतानाही मोहीम राबवताना मनपा कर्मचारी अत्यंत अघोरी स्वरूपाच्या पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे चित्र आहे. कुत्र्यांच्या जबड्यात तार टोचून त्याला फरफटत नेण्यात येत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. चुकीच्या पद्धतीमुळे प्राणीमित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गत पाच वर्षांच्या कालावधीत ७०० पेक्षा अधिक कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतरही शहरात समस्या कायमच असल्याचे दिसत आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या समस्येवर उपाय म्हणून कुत्रे पकडण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मनपाने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारासहित चार कर्मचारी कुत्रे पकडतात. कुत्रे पकडण्यासाठी गेल्यानंतर कर्मचारी अघोरी पद्धत अवलंबवत असल्याने कुत्र्यांना इजा पोहोचत आहेत.
---------------------------------------------------------------
अशा व्यक्तींवर का कारवाई करू नये?
शहरात काही व्यक्ती विकृत आनंदासाठी कुत्र्यांना मारहाण करणे, त्यांचा छळ करतात. तसेच कुत्र्यांना पडकण्याची पद्धत कमीत कमी वेदनादायी असतानाही कर्मचारी कुत्र्यांचा अघोरी बंदोबस्त करतात. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्ती किंवा कुत्रे पकडताना चुकीची पद्धत अवलंबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई का करू नये, असा सवाल प्राणीमित्रांमधून उपस्थित केला जात आहे.