शिक्षण विभागाच्या निर्ढावलेपणाचा शिक्षकांना नाहक फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:37+5:302021-05-08T04:18:37+5:30
मूर्तिजापूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या माहे मार्च २०२१ च्या वेतनाचा निधी संबंधित पंचायत समितींच्या बीडीओंच्या खात्यात दि. ५ ...

शिक्षण विभागाच्या निर्ढावलेपणाचा शिक्षकांना नाहक फटका!
मूर्तिजापूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या माहे मार्च २०२१ च्या वेतनाचा निधी संबंधित पंचायत समितींच्या बीडीओंच्या खात्यात दि. ५ मे २०२१ रोजी जमा झाला. नियमानुसार दुसऱ्या दिवशी पगार होणे अपेक्षित होते; परंतु मूर्तिजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या निर्ढावलेपणामुळे शिक्षकांना १० तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. शिक्षण विभाग आणि लेखा विभाग यामध्ये असलेला परस्पर समन्वयाचा अभाव आणि आधिकाऱ्यांची उदासीनता शिक्षकांचे पगार उशिराने होण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप ॲक्शन फोर्स संघटनेने केला आहे.
शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला अदा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्याप्रमाणे कधीही कार्यवाही केलेली नाही. सध्या २०२१ चा मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असताना मार्च महिन्याचेच वेतन झालेले नाही. आजच्या घडीला शाळांना जरी उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी जिल्हा परिषद शिक्षकांना सुट्या नाहीत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळेच्या गावात घरोघरी फिरून लसीकरण व रुग्णांचे कुटंब सर्वेक्षण, त्याच बरोबर टेस्ट अथवा लसीकरण यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. अशा परिस्थितीत वेतन अनुदान प्राप्त होऊनही वेतन अदा करण्यात होत असलेली अक्षम्य दिरंगाई चीड आणणारी आहे. याबद्दल मूर्तिजापूर पंचायत समितीच्या संबंधितांवर विलंबास प्रतिबंध, अधिनियम-२००५ अन्वये योग्य ती कारवाई करण्याची मागणी, ॲक्शन फोर्स एम्प्लॉइज असोसिएशनद्वारे करण्यात आली आहे.