निर्माणाधीन १८७ इमारतींचा पंचनामा
By Admin | Updated: August 5, 2014 00:51 IST2014-08-05T00:51:20+5:302014-08-05T00:51:20+5:30
शहरातील १८७ निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप केल्यानंतर प्रशासनाने आता प्रत्येक इमारतीचा इत्थंभूत लेखाजोगा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

निर्माणाधीन १८७ इमारतींचा पंचनामा
अकोला : शहरातील १८७ निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप केल्यानंतर प्रशासनाने आता प्रत्येक इमारतीचा इत्थंभूत लेखाजोगा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. याकरिता संपूर्ण नगर रचना विभाग कामाला लागला असून, हा अहवाल लवकरच आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना सादर केला जाईल. बांधकाम व्यावसायिकांनी कर्मशियल तसेच रहिवासी इमारतींचे नियमापेक्षा जास्त बांधकाम करण्यावर आक्षेप घेत, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी संपूर्ण निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप करण्याचे नगर रचना विभागाला आदेश दिले. उपअभियंता राजेंद्र टापरे यांनी पाच महिन्यांमध्ये आजपर्यंत १८७ इमारतींचे मोजमाप केले असून, संपूर्ण इमारतींचे बांधकाम नियमापेक्षा जास्त आढळून आले. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी नगर रचना विभागाच्या मंजुरीविनाच बांधकाम केले, अशा दोन इमारती प्रशासनाने जमीनदोस्त केल्या आहेत. उर्वरित बांधकाम व्यावसायिकांना इमारतींचा सुधारित नकाशा सादर करण्याची नोटीस जारी केली. यावर महिनाभरापेक्षा जास्त अवधी उलटून गेला असला तरी अद्यापही बांधकाम व्यावसायिकांनी सुधारित नकाशा सादर केला नाही. यादरम्यान, प्रत्येक इमारतींचा इत्थंभूत लेखाजोगा सादर करण्याचे निर्देश नगर रचना विभागाला देण्यात आले आहेत. यामध्ये मनपाकडून मंजूर झालेला नकाशा व त्यानंतर इमारतीचे झालेले बांधकाम किती, मंजूर चटई निर्देशांक (एफएसआय) चे उल्लंघन किती आदी सर्व बाबींचा लेखाजोगा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हा अहवाल लवकरच आयुक्तांकडे सादर केला जाईल